श्वेता वाळंज, झी मीडिया, मुंबई : आई आणि बाळं यांची ज्याप्रमाणे नाळ बांधली गेली आहे. त्याचप्रमाणे भारत देश आणि संस्कृती यांची नाळ हजारो वर्षांपासून बांधली गेली आहे. भारतात संस्कृती उदयास आली, आणि आपल्या पूर्वजांनी ती मनोभावे जोपासली. आताची पिढी ही संस्कृतीचा वारसा हक्क पुढे नेण्यात अग्रेसर आहे. मग तो वारसा नृत्याचा का असेना. भारतीय नृत्य कलेमध्ये अनेक राज्यातले अनोखे लोकनृत्य आहोत. प्रत्येक सणांना लोकनृत्याची वेगळीच मज्जा, धम्माल असते. लोकनृत्य म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांमधून उदयास आणलेले नृत्य संस्कृती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय नृत्य कलेला फार मोठा इतिहास लाभला आहे. भारत हा विविधतने नटलेला देश आहे. भारतात वेगवेगळ्या संस्कृतीचं जतन केलं जातं. तसंच काहीसं नृत्याच्या बाबतीत सुद्धा आहे. महाराष्ट्रात लावणी नृत्याला विशेष प्राधान्य दिले जाते. तर गुजरातमध्ये गरबा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पंजाबमध्ये भांगडा नृत्याची शानचं निराळी, अशा या भारत देशात नृत्याच्या संस्कृतीचे रंग सर्वत्र पसरले आहेत. 


भारतात एकूण ८ प्रकारचे शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत, त्यातील एक कथक


‘कथा कहे सो कथक कहलावे’ कथा म्हणजे गोष्ट आणि तिच गोष्ट कथेच्या माध्यमातून कथन करणाऱ्या कलाकारास कथक कलाकार असे संबोधले जाते. कथक नृत्यात अनेक ताल नाचले जातात. तीनताल, झपताल, एकताल, रूपक इत्यादी. प्रत्येक तालाची वेगळी अशी माहिती आहे. घुंगरूंची छम-छम आणि तबल्याचा ठेका त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी अगदी मनाला मंत्रमुग्ध करून जातात. 


ताथैथैतत् आथैथैतत्, धागेतीट तागेतीट अशा अनेक बोलांच्या साच्यात कथक नृत्य बांधले गेले आहे. आताच्या युगात सुद्धा कथक नृत्यशैलीला एक विशेषस्थान आणि महत्व आहे. कथक ही एक जमात असून या जमातीतील लोक गावोगावी प्रवास करून आपली उपजीविका करत असत. शंकराचा डमरू आणि श्री कृष्णाची बासरी जेवढी प्राचीन आहे, त्याचप्रकारे कथक नृत्यही प्राचीन आहे.  


कथक नृत्यामध्ये विशेषत: तीन घराणे आहेत, लखनौ, जयपूर आणि बनारस... अलिकडे नव्याने उदयास आलेले घराणे म्हणजे रायगड घराणे. आपल्या पूर्वजांबरोबर मिळालेला हा संस्कृतीचा वारसा कथक कलाकार अगदी प्रेमाने आणि आपुलकीने जोपासतात.


नवाब वाजीद अली शहा यांचा काळ कथक नृत्यास अधिक लाभदायक ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नवाब वाजीद अली शाह यांच्या दरबारात लखनौ घराण्याचा उदय झाला. मजबूत हिंदू धार्मिक बंध जाणवणाऱ्या जयपूर घराण्याचा जन्म राजस्थानमधील राजपूत राजांच्या आश्रयाने झाला. बनारस घराणे हे जानकीप्रसाद घराणे म्हणून ओळखले जाते. या घराण्यामध्ये नर्तक नाजूक हावभावाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन आणि श्रीकृष्णाचे ध्यान करत असतो.


सुमारे हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आजची तरूण पिढीही तितक्याच मनोभावे जोपासत आहे. शिव शंकराचे तांडव नृत्य, पार्वती देवींचे लास्य, मथुरेचा लबाड कृष्ण, राधा आणि कृष्ण यांचे प्रेम संबंध, रामायण, महाभारत अशा अनेक कथा कथक कलाकार त्यांच्या कथक कलेच्या माध्यमातून आजही यासर्व गोष्टींना दुजोरा देतात. आताच्या युगात अनेक नवनवीन गाणी येतात. मून्नी आली, त्यानंतर शिला आली, कित्येक गीत आले आणि गेले, कोंबडीची तर चक्क चमेली झाली. पण तो हजारो वर्षांपूर्वीचा तो प्राचीन इतिहास तसाच जिवंत आहे.