कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड आटपाट नगरातील अविकसित भागाच्या विकासासाठी तब्बल 425 कोटींच्या मुद्रांची कामे एकाच दिवशी मंजूर झाल्याने उठलेले वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम लक्ष्मणाच्या राज्यात या कामामुळे लक्ष्मण अर्थात शंकर चांगलाच चिढलेला असताना राम मात्र शांत आहे...मात्र तो मनातून चांगलाच हसतोय...!


हा राम म्हणजे खरे तर महेश...! 425 कोटींची कामे ज्या अविकसित भागासाठी निघाली ती खरे या रामाच्या हद्दीतील....! कामे निघाल्या पासून अ'पारदर्शक' वर्तमानपत्रातून केवळ आटपाट नगराचे अर्थ खाते आणि पर्यायाने शंकरावरच हल्ला चढवला गेला....ज्या नतद्रष्ट विरोधकांनी हल्ला चढवला तो ही अर्थ खाते आणि शंकरवरच....त्यातुन महापालिकेचा श्रावण ही सुटला नाही...!पण राम मात्र सुटला...अर्थात तेल लावलेला पैलवान असल्याने तो सुटला असावा हा अंदाज जाणकार व्यक्त करतायेत...!


शंकरावर हल्ला चढत असताना राम त्यामुळेच हलके हलके हसत होता...! रामाच्या चेहऱ्यावर मंद हास्य असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिल्लीरूपी रणसंग्रामातल्या संभाव्य विरोधक असलेल्या दादा खासदाराला मात्र अंगावर घेतले...


वास्तविक पाहता या दादा खासदाराने ही शंकर अर्थ खाते आणि श्रावण यांच्यावर हल्ला चढवला होता....पण संभाव्य विरोकाला सोडायचे कसे...मग काय रामाच्या कार्यकर्त्यांनी अविकसित भागाच्या विकासात दादा खासदाराचा खोडा असा आकांड तांडव केला....पुन्हा एकदा अ'पारदर्शक' वर्तमानपत्रांनी त्याला चांगलंच महत्व दिले आणि रामाच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित हास्य आले...!


हे कमी होते की काय म्हणून रामाने बैलगाडी, पंतप्रधान आवास योजनांचा आधार घेत ही या तेल लावलेल्या पैलवानाने दादा खासदाराला चांगलेच फैलावर घेतले...! बैलगाडा मालकांचा पुळका दादा खासदाराला फक्त निवडणूका आल्या की होतो, या दादा खासदाराने चाकणच्या विमानतळाला विरोध केला असे आरोप करत दादा खासदाराला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला...! 


त्याला ही पुन्हा प्रसिद्धी....मग काय राम पुन्हा हसला.....! पण राम हसत असला तरी अविकसित भागातल्या 425 कोटी मुद्रांची धूळ आज ना उद्या रामाच्या अंगावर उडणारच नाही हा रामाचा आशावाद किती दिवस टिकणार हा तसा प्रश्नच आहे....हाच विचार अनेकांच्या मनात सुरू असताना पिंपरी चिंचवडकर जनता ये पब्लिक है सब जानती हैं हा विचार करत बसली असताना आणखी एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले...!