मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : ये....पेप्सीवाले....ऑरेंज, खट्टा मिठ्ठा पेप्सीवाला.....स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसातली. दुपार...आणि सायकलीने गावात पेप्सी विकायला येणारा पेप्सीवाला. सायकलच्या मागच्या कॅरीवर  थर्मोकॉलने बनवलेला खोका त्यात मीठ आणि बर्फ...आणि त्यात ठेवलेल्या रंगबिरंगी पेप्सी. सायकलला लावलेला हवेच्या दाबाचा पॉम पॉम करणारा भोंगा वाजला की गावातल्या सर्व मातामंडळी त्याच्या नावाने बोंबलायच्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अय बॉ...अर तिकडं जाय ना...आमचीच गल्ली दिसती का तुले..? आणि आपण तो भोंगा ऐकला रे ऐकला की मग आपण  पैशासाठी बोंबलायला सुरुवात करायची. वेळी फुफुटयात लोळून घ्यायचे.  आपल्यातील काही महाभाग पैशासाठी नको नको ते उद्योग
करायचे. 


देशी दारूची बाटली...केस आणि भंगारसारखे मौल्यवान दागिने जपून ठेवत ऐन वेळेवर मोडायचे. ज्यांच्याकडे हे दागिने नसायचे आणि आईकडूनही नकार यायचा त्यांना पैसे मिळायचे ते आजीकडून...पैसे मिळाल्यानंतरचा अनुभव म्हणजे प्रॉपर्टीतील एक वाटा मिळाल्यासारखा असायचा...! 


1 रुपयाला एक पेप्सी आणि 50 पैशाला अर्धी. अर्धी पेप्सी देण्याची पद्धत भारीच होती की, पेप्सीवाला ब्लेडने त्यातली अर्धी पेप्सी चिरून द्यायचा आणि मग आपण त्या दोन तुकड्यातही नजरेने मोजमाप करायचो..आणि मनातल्या मनात...अरे याने आपल्याला कमी तर दिली नाही ना ? 


बरं मग तीन चार जण पारावर बसून मस्त पेप्सी हानायची...हातावर कोपरापर्यंत आलेले वघळ म्हणजेच डाग अजूनही आठवतात. मग पेप्सी खाणं झाली की मग त्या रिकाम्या पाऊच मध्ये हवा भरायची आणि मासळी सारखा आकार बनवायचा...आणि त्या पाऊचचं तोंड बंद करून दुसऱ्या तळहातावर फटाका फोडायचा हे आपले उद्योग. 


काही नाही हो ...फक्त पाणी, कलर आणि साखरेचा  वापर करून बनवलेली ती पेप्सी असायची पण तिची मजा काही वेगळीच होती. व्हॅनिला, अमेरिकन ड्रायफ्रुट, काजू आणि पिस्त्याच्या आईस्क्रीम्स आपल्या त्या पेपशीची बरबरी करूच शकत नाही......काय म्हणता?