सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : देशाचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात मासे, अंडी, डार्क चॉकलेटसारख्या पदार्थांचा समावेश करा असं सांगितलं. ट्विटरवरही तशी माहिती दिलीय. यात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या त्या चॉकलेट या शब्दानं. चॉकलेट म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मुलींना तर जास्तच आवडतं. पण आपण रोज खातो त्या चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट हे मॅटर जरा वेगळं आहे.    


डार्क चॉकलेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 साध्या चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट चवीला खूप वेगळं असं. त्याची चव कडवट असते. आणि चॉकलेट कडु कसं बरं चालेल? पण दीड वर्षापासून रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अख्या जगात काय काय उपाय लोकांनी केले. आपल्याकडची तर तऱ्हा सगळ्यात वेगळी. देशात आयुर्वेदाचा प्रभाव त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे काढे काय प्यायलो, प्रोटिनयुक्त पदार्थ काय खाल्ले. पण आता आरोग्यमंत्र्यांनीच सांगितंलय म्हटल्यावर डार्क चॉकलेट खाल्लच पाहिजे ना भाऊ....पण ते औषधासारखंच कडू... त्यामुळे थोडी अडचणच... पण या कडू चॉकलेटचे फायदे फार आहेत बरं 


फायदे 


उत्तम दर्जाच्या डार्क चॉकलेटची चव आपल्याला आवडणाऱ्या उत्तम चॉकलेटइतकी उत्तम नसतेच कधी. त्यात साखरेचं प्रमाण नाही बरोबरच असतं. पण सर्वसाधारणपणे डार्क चॉकलेट न्युट्रिशयस असतं. त्यात मिनिरल्स, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनिज, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, सेलियम असतं. शिवाय या डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडन्ट्सचं प्रमाण अधिक असतं. (तुम्हाला तरुण दिसायचं असेल तर मग डार्क चॉकलेट ट्राय करायलाच हवे) हे डार्क चॉकलेट मेंदुच्या आरोग्यसाठी उत्तम असतात. सध्या कोरोना काळात मेंदुचा भुगा होईल अशी आपली अवस्था झालीय मग अशात डार्क चॉकलेटनं हा भुगा सांधायला मदतच होईल. 


तुम्हाला हे माहितीय का.... 


या डार्क चॉकलेटबाबत अंधारात असलेली एक बाब म्हणजे जगभरातल्या विशेषत: आशियातल्या सैनिकांच्या आहारात डार्क चॉकलेटचा समावेश असतो. घातलीत ना तोंडात बोटं... डार्क चॉकलेटनं मन प्रसन्न राहतं. सैनिक अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राहतात. कुटुंबियांपासून दूर.. सियाचेनसारख्या भागात सैनिकांनी गस्त घालणं म्हणजे तर महाकठीण काम.. मग अशा वातावरणात मन प्रसन्न राहणंही तितकच गरजेचं आहे. शिवाय इतक्या उंचावरून देशाचं रक्षण करत असताना इतर साहित्यासोबत खाद्यपदार्थांचं वजन वाढवून कसं चालेल? अगदी सहज खिशात ठेवता येईल असा पदार्थ आणि ज्यातून इन्स्टंट एनर्जी मिळेल असा पदार्थ कुठला तर मग डार्क चॉकलेट म्हणून सैन्याच्या खिशात तुम्हाला डार्क चॉकलेट दिसेल. शिवाय नेपोलियन बोनापार्टनही सांगूनच ठेवलंय 'ऍन आर्मी मार्चेस ऑन इट्स स्टमक'  


डार्क चॉकलेट आणि कोरोना 


कोरोना आल्यापासून प्रत्येकाच्या मनात अनामिक भीती आहे. त्यामुळे मनाचं स्वास्थ जपणंही आवश्यकच. प्रसन्न मनासाठी अनेकजण चॉकलेट खातात. डार्क चॉकलेट तर मनाच्या आरोग्यासाठी आणि हृदयासाठीही चांगलं आहे. पोस्ट कोविड अनेकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला, आणि हे डार्क चॉकलेट तुमच्या शरीरातलं गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यात मदत करतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही काही प्रमाणात कमी करता येतो. कोविड सेंटरवर असताना अनेकांना एकटेपणा जाणवतो मग अशात जर सोबतीला डार्क चॉकलेट असेल तर एकटेपणा जाणवणार नाही. कारणं काहीही असोत चॉकलेट म्हटल्यावर ट्राय करना तो बनता है बॉस...