- गिरीश  सर्जेराव निकम


थोडं देव दर्शनाचं वेड आहेच. त्यातही स्थान महात्म्य असलेली ठिकाण जास्त भावतात. भौतिक सुख नाही तर अध्यात्मिक क्षेत्रच स्थिरता आणि टिकणार आनंद देतात. इथे कसोटी आहे. पण मनःशांती इथेच आहे. गेल्या काही काळात अष्टविनायक, गणपती आणि देवीची साडेतीन शक्तीपीठ, श्री दत्त क्षेत्रांपैकी गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, औदुंबर, कारंजा इथं दर्शन घेतलं होतं. दरम्यान गिरनार पर्वत अनुभवावरील पुस्तक वाचण्यात आलं होतं. तिथली ओढ होतीच. पुण्यातील थोर दत्त उपासक गुरुवर्य अरुण पंढरी आणि त्यांची शिष्य मंडळी जून 2017 मध्ये गिरनारला जाऊन आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(अरुण  पंढरी गेल्या सहा दशकांपासून दर पौर्णिमेला गाणगापूरला जातात. एकही पौर्णिमा चुकली नाही) मलाही बोलावणं होत. पण जमलं नव्हतं. मनात रुखरुख होती. बरोबर 1 वर्षांने मे 2018 मध्ये उत्तम साधना करणारा मित्र नरेंद्र बियाणी याने गिरनार, सोमनाथ यात्रेला येतोस का ? म्हणून विचारलं. सुरुवातीला नाही म्हणालो. पण अचानक एका सोमवारी काय स्फूर्ती झाली कुणास ठाऊक त्याला सांगितलंय येतो मी...लगेच ऑफिसमध्ये सांगितलं मला सुट्टी हवी. घरीही कळवलं मी गिरनारला जाणार आहे. नरेंद्रने लगेच टुरिस्ट आयोजकांना माझं नाव कळवलं. लगेच माझे पैसेही त्याने ऑनलाइन पाठवले. या सगळ्या घडामोडी तासाभरात झाल्या. मग नरेंद्रने 'इझी' ट्रॅव्हलचा शेड्युल मेसेज मला पाठवला. 26 ते 29 मे अशी यात्रा होती. माझ्या सोसायटीतील फ्लॅटच्या पायऱ्या चढताना दम लागतो. गिरनारच्या 10 हजार पायऱ्या कशा चढणार?  बायकोचा प्रश्न आणि उत्तरही होतं...जेवढं जमेल तेवढं जा.. पुण्यातील मित्राने थोडं मार्गदर्शन केलं.


गुजरातच्या दिशेने...


मुबईतून दुपारी रेल्वेने प्रवास सुरु झाला. वापी, आणद, सुरत, बडोदा, भरुच असं एक-एक शहर जात होतं. गुजरात मनात साठवत गेलो. आमच्या डब्यात नरेंद्र, त्याचा भाऊ महेश आणि टूर समन्वयक अरुण होता. रात्री 10 ला अहमदाबादला स्टेशनला पोचलो. तिथे इझी टूरचे प्रमुख चेतन केळकर यांची ओळख झाली. अहमदाबादवरून सोमनाथ एक्सप्रेसने सकाळी सहाला सोमनाथला आलो. त्रिवेणी संगम, श्रीकृष्ण मंदिर-भालका तीर्थ (जिथे भिल्लाचा बाण लागला. श्रीकृष्णाने देह ठेवला. आपले अवतार कार्य  संपवले ) आणि सोमनाथ मंदिर दर्शन करून पुढे दोन तासात 4 वाजेपर्यंत ऐतिहासिक शहर जुनागढला आलो. या शहरालगत गिरनार पर्वत आहे. (जुनागड शहारत जुन्या प्रसिद्ध पटेल डायनिंग हॉल मध्ये गुजराती थाळीचा जरूर आस्वाद घ्या..महाग नाही आणि अप्रतिम चव) जुनागडला मुक्कामी हॉटेल मध्ये चेतन यांची सविस्तर भेट झाली. त्यांचे आणि त्यांनी इतरांचे सांगितलेले गिरनारचे अनुभव  मनाला भिडले. 



मन आणि शरीराची घुसळण...


चेतन यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 10.30 वाजता  काठी घेऊन पर्वत चढायला सुरुवात केली. आमच्या ग्रुपमध्ये मुंबईचे हरदयाल सिंग नावाचे अत्यंत श्रद्धाळू गृहस्थही  होते. सिद्धिविनायक, अष्टविनायक आणि इतर अनेक ठिकाणी यात्रा, देव दर्शन करण्याचे त्यांनी विक्रम केलेत. पुण्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी मॅडम, समन्वयक महेंद्र सनेर आणि पुणे-मुंबईचे मिळून 21 जण होतो. काही अनुभवी तर काही नवखे होते. गप्पा, ठिकठीकाणी अनुभव कथन होत पुढे जात होतो. पर्वतावर पाहिलं जैन मंदिर, नंतर अंबा माता मंदिर, आणखी उंच गेल्यावर गोरक्षनाथ  यांची समाधी  लागते. दोन हजार, पाच हजार, आठ हजार पायऱ्या चढत मार्गक्रमण सुरू असतं. घामाच्या धारा, प्रचंड दमतो, पाय दुखतात. एक क्षण नको वाटतं. इथंच बसून घ्यावं. इथूनच वरती पादुकांना नमस्कार करावा...असं क्षणभर वाटतं. पण नंतर विचार बदलतो. काहिही होऊदे आता दर्शन घेऊनच परतायचं असा निर्धार होतो. 


भावनांचा कडेलोट...


रात्री पर्वत चढताना ( उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शक्यतो रात्रीच निघायचं. अनेक जण पौर्णिमेला निघतात. चंद्रप्रकाशही  जास्त असत आणि पौर्णिमेच महत्त्व) गार वारा, ठिकठिकाणी औदुंबर वृक्ष, चंद्र, चांदण्या तुम्हाला काहीतरी सांगतात. विलक्षण भारलेल वातावरण असतं. एखादी वृद्ध व्यक्ती तुमच्या शेजारून जाते. ते बघून तुमच्यात ऊर्जा येते. खूप उंचावर गेल्यावर वारा जोरात वाहात असतो. चालताना काळजी घ्यावी... सावकाश पण सलग चालावे. जास्त वेळ कुठे बसू नये. तुमचं शरीर आणि मन अक्षरशः घुसळून निघतं. येणाऱ्या जाणाऱ्यांचा 'जय गिरनार'चा घोष असतो. एक अनामिक शक्ती शेवटच्या पायरी पर्यंत नेतेच... पहाटे श्री दत्त गुरू पादुकांचे दर्शन झाल्यावर भावनांचा कडेलोट होतो. मन रिकामं होतं. सगळे विकार गळून पडतात. अहंकार  लुप्त होतो. आकाशाकडे पाहिल्यावर असं वाटत सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर इथे जवळच राहतो. खूप हलकं वाटतं. सकाळची प्रसन्न वेळ असते. पर्वत उतरताना नाथपंथीयांचा महाप्रसाद तुम्हाला ऊर्जा देतो.



 


सोबतीला सकाळी हाताशी आलेले ढग असतात. हाच का तो मार्ग आपण रात्री गेलो...खरं वाटत नाही. उतरताना थोडा त्रास होतो. ऊन असतं. खूप त्रास झाला तर डोलीचा पर्याय आहे. चेतन बोलले होते, गिरनारवारी तुमची कधीच रिकामी जाणार नाही. तुम्हाला काही ना काही अनुभव येईलच. काहीतरी गवसेलच. दर पौर्णिमेला पादुका घेऊन अनवाणी पर्वत चढणाऱ्या चेतनजी या अवलीयाला मात्र नमस्कार...हे एक अजब, गूढ (उच्च शिक्षित) रसायन वाटलं. त्यांच्या देहबोलीत, बोलण्यात तर कधी सिगारेटच्या झुरक्यात...बेफिकिरी, समर्पण, सेवाभाव आणि आत्मानंद असे विविध भाव जाणवले. 


गिरनारशी इतका एकरूप झालेला माणूस दुर्मिळ...त्यांच्या नेतृत्वात यात्रेद्वारे भाविक पर्वतावर येत राहावेत. दत्त प्रभूंच्या मनातही हेच असावं. शरीर आणि मन स्वछ करण्यासाठी गिरनार सारखी यात्रा नाही. असा माझा अनुभव आहे. एकदा तरी ती कराच...त्यात नियमित साधना करणारे आणि दत्त उपासक मंडळी तुमच्या बरोबर असतील तर दुधात साखर....गिरनारवरही रोप वे होणार आहे. असं ऐकून आहे. पण जे मंथन पायी पर्वत चढताना होतं. त्याची सर 'रोप वे'मध्ये नसेल. ती कोरडी वारी ठरेल.