धनंजय शेळके, झी 24 तास, मुंबई : गोव्यात 40 जागांसाठी सोमवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला मतदान (Goa Assembly Election 2022) होत आहे. गेल्या काही वर्षातील गोव्याच्या राजकारणावर नजर टाकली तर गोव्याचं राजकारण हे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या भोवती फिरताना दिसत आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party), राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष काही प्रमाणात आपले अस्तित्व दाखवत असले तरी नेहमीच त्यांनी काँग्रेस किंवा भाजप यांच्यासोबत आघाडी करुन निवडणूक लढवलेली आहे. यंदा मात्र अनेक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (goa assembly election 2022 voting to be held 14 february for all 40 seats know political scenario)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस गेल्यावेळी 17 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश आलं नाही. काँग्रेसमधील काही आमदार फुटले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. तर काही इतर छोट्या पक्षांनीही भाजपला साथ दिली. दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार सत्तेवर आलं. निवडणुकीच्या तोंडावर तर काँग्रेसमध्ये उरलेल्या बहुतेक सर्वच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळेच काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात नवे उमेदवार दिले आहेत.


गेल्यावेळी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षानं यावेळी काँग्रेससोबत आघाडी केली आहे. तर पहिल्यांदाच गोव्याच्या राजकीय आघाड्यात प्रवेश केलेल्या तृणमुल काँग्रेससोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आघाडी केली आहे.


गेल्या निवडणुकीत मते कमी मिळाली असली तरी संपूर्ण गोव्यात अस्तित्व दाखवणाऱ्या आम आदमी पार्टीनेही जोरदार शड्डु ठोकले आहेत. तर भूमिपुत्रांच्या न्याय हक्काची लढाई लढत रिव्होलुश्नरी गोवन्स पार्टी या पक्षानेही राजकीय नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे.


गोव्याची अर्थकारण


गोव्याची अर्थव्यवस्था ही पर्यटन आणि मायनिंग या दोन गोष्टींवर अवलंबून आहे. मायनिंग गेल्या 10 वर्षांपासून बंद आहे. गोव्यातील जवळपास 3 लाख लोकं या व्यवसायावर अबलंबून होते. ते सर्व लोक बेकार आहेत. तर दुसरीकडे कोरोनामुळे जवळपास 3 वर्षांपासून पर्यटन व्यवसायही बंद असल्यात जमा आहे. त्यामुळे गोव्याचं आर्थिक चक्रच थांबल्याचं चित्र आहे. त्याचा मोठा परिणाम गोव्यातील जनतेच्या रोजगारावर झाला आहे. 


मायनिंग सुरू करण्याच्या मुद्यावरुन सत्तेवर आलेल्या भाजपलाही मायनिंग सुरू करता आलेलं नाही. त्यामुळे भाजपवर मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीत भरच पडलेली आहे.


दोन भागात गोव्याची विभागणी


दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा अशी गोव्याची विभागणी होते. दक्षिण गोव्यात ख्रिश्चिन समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर उत्तर गोवा हिंदु बहुल आहे. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं 40 पैकी 39 जागा लढवल्या होत्या. त्यापेकी 38 जागांवर त्यांचं डिपॉजीट जप्त झालं होतं. मात्र त्यांना 6 टक्ते मतं मिळाली होती. गेल्या पाच वर्षात त्यांनी चांगली तयारी केली आहे. 


हिंदु मतांमध्ये तब्बल 40 टक्के असलेल्या भंडारी समाजाचे अमित पालेकर यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. आपच्या काही जागा निवडूण येतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.


भूमिपुत्रांचा मुद्दाही ऐरणीवर


दुसरीकडे गोव्यात भूमिपुत्रांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. बाहेरुन आलेल्यांमुळे आपल्या रोजगारांवर गदा येत असल्याची आणि आपण आपल्याच राज्यात परगंदा होत असल्याची भावना मूळ गोव्यांच्या लोकांमध्ये वाढीला लागत आहे. त्यातूनच हा भूमिपुत्रांचा लढा पुढे येत आहे. 


मनोज परब या मराठी तरुणानं रिव्होलोश्नरी गोवन पार्टीच्या बॅनरखाली हा लढा सरु केला आहे. तरुणांचा चांगला पाठिंबा त्यांना मिळत आहे. त्यांनीही नजीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही काही प्रमाणात फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.


टीएमसीने गोव्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केली. काँग्रेसचे अनेक मोठे ख्रिश्चन  नेते पक्षात घेतले. त्यात अनेक माजी मुख्यमंत्री, मंत्री आणि माजी आमदार खासदार यांचा समावेश आहे. पण ज्या प्रकारे सुरूवात केली तो टेम्पो टीएमसीला टिकवता आला नाही. 


ममता बॅनर्जी त्यांचे उमेदवार उभे न करता उत्तर प्रदेशात सपाच्या प्रचाराला आल्या. पण गोव्यात स्वताःचे उमेदवार असतानाही त्या प्रचाराला आल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये टीएमसी नक्कीच फूट पाडेल. पण ज्या प्रमाणे अंदाज वर्तविला जात होता त्या तुलनेत आता काँग्रेसला कमी डॅमेज होण्याची शक्यता आहे. 


यानंतरही भाजपनं अनेक असे दिग्गज उमेदवार रिंगणात उभे केले आहेत, जे कोणत्याही पक्षात असो किंवा अपक्ष म्हणूनही ते जिंकून येतात. या बळावर भाजप पुन्हा बाजी मारते की काँग्रेस नव्याने उभारी घेते. की आप किंवा तृणमूल यांच्या हाती सत्तेच्या चाव्या जातात हे पाहण्यासाठी आपल्याला 10 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.