कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पिळदार मिशा आणि अंगावर वर्दी असलेला आपलाच राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा फोटो पाहत पोलिस आयुक्तालयात 'कृष्ण' सर येरझाऱ्या घालत होते...! चेहऱ्यावर कमालीची उदासी पसरलेली होती...! तिथेच टेबल वर काही दिवसांपूर्वी वेषांतर करून वाकड, हिंजवडी आणि पिंपरी पोलिस स्टेशन ला दिलेल्या भेटीचा कौतुक सोहळा सांगणारा वृत्तांत वर्तमान पत्रात दिसत होता..! त्या वृत्तात असलेल्या आपला वेषांतर केलेला लूक पाहून तर ते आणखी उदास झाले...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरे शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही कोण झटतो हे यांना कसे कळणार, असा विचार त्यांच्या मनात आला...! पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी आम्ही आठवड्यातून सरासरी चारदा पत्रकार परिषद घेतो..! अगदी बाईक चोर पकडले काय किंवा काही तोळे सोने पकडले काय, आमच्या पोलिसांचे कौतुक व्हावे म्हणून आम्ही तासनतास पत्रकारांशी संवाद साधतो... पत्रकार परिषदा घेतो...पण आज त्याच पत्रकारांपैकी काही जण माझ्या आयर्नमॅन इमेजला धक्का देत आहेत.


अरे कोण तो आमदार 'अण्णा'... त्याच्यावर गोळीबार झाल्याचे तो सांगतो काय...! पण त्याचे ऑफिस काचेचे, असे असताना ते फुटत नाही, गोळी कुठे लागली याची खूण कोठेच सापडत नाही आणि कोणी जखमी ही होत नाही अशी अनेकांची ओरड...! त्या साठी आम्हाला प्रश्न..आमच्या विश्वासहरतेवर प्रश्नचिन्ह... त्यात आमचा काय दोष असा विचार 'कृष्ण' सरांच्या मनात आला आणि ते आणखी संतापाने लाल झाले..!  हे कमी की काय म्हणून दोन गुन्हे दाखल असलेल्या अण्णा पुत्र 'सिद्धार्थ' ला आठ दिवस झाले तरी पोलिस अटक करू शकले नाहीत या बाबतही आमच्यावरच आरोप...! काय तर म्हणे राजकीय दबाव...! छे छे असे म्हणत 'कृष्ण' सर आणखी उदास झाले..! अरे किती तरी पत्रकारांशी आपले चांगले संबंध, अर्थात त्यांनी ही आपल्या प्रत्येक कामाला उचलून धरत आपली प्रतिमा कायम उजळण्याचा प्रयत्न केला, पण आताच काय झाले, काय हा प्रसंग..! आपल्या विरोधात लेखण्या सरसावल्या...किती तरी कष्ट उपसून जपलेल्या या इमेजला असा तडा असा विचार 'कृष्ण' सरांच्या मनात डोकावला..! 


असंख्य विचारांचे काहूर मनात चालू असतानाच कृष्ण सरांच्या केबिन मध्ये त्यांचा लाडका 'विठ्ठल' आला. अनेकांशी गोडी गुलाबीने बोलून ही काही जणांनी लेखण्यांनी वार केल्या मुळे हा विठ्ठल ही घाबरलेला...! कृष्ण सर आता रागवणार तर नाहीत ना असा विचार मनाला शिवला...! तोच सरांनी कटाक्ष टाकत हे घडले कसे असा नजरेनेच सवाल केला...! सरांचे ते रौद्र रूप पाहून विठ्ठल हादरला, सर मी करतो काही तरी असा विश्वास त्याने द्यायचा प्रयत्न केला. पण आता काही ही केले तरी अनेक पत्रकारांच्या लेखणीचे बाण सुटल्याने झालेले नुकसान भरून निघणार नाही याची कल्पना दोघांना आली..!


एवढ्या मोठ्या शहराची जबाबदारी पार पाडताना थोड्या चुका होणारच..! आता झाल्या प्रसंगात तो सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल हा योगायोग आहे त्यात आपला काय दोष...! आता आमदार पुत्र सापडत नाही तो ही एक योगायोगच नाही का असा विचार कृष्ण सर करू लागले..! एरवी आपण किती तत्परता दाखवतो आणि गुंडांच्या मुसक्या आवळतो, प्रसंगी वेषांतर करतो, हे सगळे कशासाठी शहरासाठीच ना..! आणि असे असताना केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि त्याच्या पुत्रावर काही कारवाई होत नाही म्हणून आम्हाला प्रश्न हे योग्य नाही असा विचार कृष्ण सर करू लागले आणि यातून बाहेर कसे पडायचे या प्रश्नाने व्याकुळ होत ते आणखी उदास झाले....!