ता मंगेशकर. गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, गानसरस्वती, अशी विविधांगी ओळख एकाच गायिकेला मिळण्याचं भाग्य कदाचित जगातील हे एकमेव नाव असेल. लतादीदींचा जन्म इंदोरचा.  मास्टर दीनानाथांची कन्या ते भारतरत्न लता मंगेशकर...इथपर्यंतचा हा प्रवास कुणालाही हेवा वाटावा असाच आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं. आणि घरातली मोठी बहीण म्हणून लतादीदींना आपल्या भावंडांची आणि आईची जबाबदारी घ्यावी लागली.  मग  घरात आर्थिक पाठबळ देण्यासाठी मिळेल ते काम करण्याचं लतादीदींनी ठरवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी सुरुवातीला म्हणजे 1942 च्या सुमारास पहिली मंगळागौर, चिमुकला संसार, बडी माँ, जीवनयात्रा, छत्रपती अशा काही सिनेमांतून पडद्यावर भूमिकाही केल्या. अर्थातच सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा होताच. मात्र आवाजातच अशी काही जादू होती की या सात्विक आवाजापुढे संघर्षालाही नमते घ्यावे लागले.


एकामागून एक गाणी मिळत गेली आणि त्या गाण्यांना लतादीदींचा स्वरसाज अधिक फुलवत गेला. संगीतकारांसाठी लतादीदी म्हणजे जणू अमृतस्वरांचा खजिनाच ठरू लागला. पिढ्या बदलल्या, नायिका बदलल्या...मात्र लतादीदींचा आवाज नव्या नायिकांनाही तितकाच शोभून दिसला. मग ते मधुबालाचं गाणं असो की थेट पुढच्या पिढीची अभिनेत्री माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल असो. लतादीदींचा आवाज त्या नायिकेच्या वयाचाच होउन जातो  


लतादीदींचे चाहते फक्त सर्वसामान्य रसिकच आहेत, असं नाही, तर अनेक कलाकारही दीदींचे निस्सिम चाहते आहेत. दीदींचा स्वर म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणतात तो हाच का असं म्हणत दीदींच्या सुरांना  अनेकजण सलाम करतात.


महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण ते भारतरत्न अशा अनेक पुरस्कारांनी लतादीदींचा सन्मान करण्यात आलाय. आजही अऩेकघरांमध्ये लतादीदींच्या सुरांनीच दिवसाची मंगलमय सुरुवात होते, हीच या सुरांची ताकद आहे. हीच या सुरांची जादू आहे आणि हाच या सुरांचा आनंददायी ठेवा आहे. हा ठेवा आणि हे सूर असेच वर्षानुवर्ष बहरत राहोत अशीच प्रार्थना करुया...लतादीदी 90 व्या  वाढदिवसानिमित्त तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा.