काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीतील घोळ संपेना
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गोंधळ संपण्याची चिन्हे नाहीत.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील तिसर्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गोंधळ संपण्याची चिन्हे नाहीत. सांगलीचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. मात्र काँग्रेसला अद्याप पुण्याचा उमेदवार ठरवता आलेला नाही तर राष्ट्रवादी रावेरच्या उमेदवाराच्या शोधात आहे.
चार महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घोळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तरी संपायला तयार नाही. सुरुवातीला जागा वाटपावरून दोन्ही पक्षातला गोंधळ सुरू होता. मागील आठवड्यात महाआघाडीची घोषणा होताना कुठला पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार हे जाहीर करण्यात आले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा आधीच सोडली होती. मात्र दुसरी जागा सोडण्यावरून काँग्रेसमध्ये घोळ होता. अखेर हा घोळ संपवण्यात आलाय.
मात्र काँग्रेसमधील घोळामुळे राजू शेट्टी यांना सांगलीतील उमेदवार ठरवता आलेला नाही. येत्या दोन दिवसात राजू शेट्टी याबाबत निर्णय घेणार आहेत. पुण्याचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय अद्याप काँग्रेसला घेता आलेला नाही. इथे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड हे पुण्यातून लढण्यास इच्छूक होते. मात्र काँग्रेसने दाद न दिल्याने नाराज होत त्यांनी आता माघार घेत नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीने आपले 21 उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत. मात्र रावेरमध्ये एकनाथ खडसे यांची सुन खासदार रक्षा खडसे यांचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रवादीला उमेदवार सापडेना. शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना पक्षात घेऊन रावेरमधून उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. भाजपामध्ये ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरून निर्णय होत नाही, तर काँग्रेस राष्ट्रवादीत तीन जागांचा घोळ अद्याप कायम आहे.