कैलास पुरी, झी मिडिया, मुंबई : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आल्यानंतर अनेकांना आनंद झाला. त्यामध्ये माझ्यासह अनेक पत्रकारांचाही समावेश होता. विरोधी पक्षात असताना त्यांनी केलेली आंदोलने, त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे यामुळे महाराष्ट्राला एक सुसंस्कृत, तरुण उमदा मुख्यमंत्री मिळाल्याचा आनंद अनेकांना झाला. राज्यातल्या समस्या बऱ्यापैकी सोडवल्या जातील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. सुरुवातीचे काही महिने स्थिर स्थावर होण्यासाठी घालवल्यानंतर फडणवीस यांनी पहिला वार केला तो एकनाथ खडसे यांच्यावर. पक्षांतर्गत विरोधक ठेवायचा नाही, देशात ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेवा सत्ताकेंद्र आहे त्याच पद्धतीने राज्यात आपण व्हायचे या महत्वकांक्षेची सुरुवात खडसे यांच्या बळीने झाली. ते सुसंकृत राजकारण करतील या अपेक्षेने आनंदित झालेल्यांच्या मनात पहिल्यांदा तिथेच पाल चूकचकली. पण राजकारण म्हटले की, शाह काटशह आलेच असे समजून अनेकांनी त्याकडे डोळेझाक केली, तीच खरी अनेकांची चूक झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे खडसे यांचा पद्धतशीर काटा काढल्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि इतर संभाव्य विरोधकांना त्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी व्युव्हरचना आखली आणि त्यात ते यशस्वी ही झाले. राज्यात झालेल्या महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत गेले. मराठा आंदोलन आणि इतर आंदोलने यशस्वीरित्या हाताळल्यानंतर तर महाराष्ट्रात भाजपकडे त्यांच्याशिवाय दुसरा नेताच नाही हे चित्र उभे झाले. त्यातच इमेज बिल्डिंग साठी ठेवलेल्या लोकांनी सातत्याने त्यांच्या प्रतिमेचे संवर्धन कसे होईल या साठी प्रयत्न केलेच. या सर्व घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाच्या काळात राज्याच्या आर्थिक, सामाजिक परिस्तिथीवर दूरगामी सकारात्मक परिणाम होईल असे कोणते काम केले ? याकडे कोणाचे लक्ष गेले नाही किंवा ते जाऊ दिले गेले नाही. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आनंद झालेल्यानाही त्याचा विसर पडला, किंबहुना तो पाडावा लागला.  



राज्यात सर्वशक्तिमान नेता झाल्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या आणि मग तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पुरता भ्रमनिरास होऊ लागला. तिकीट वाटपात पक्षातील सर्वच विरोधकांचे तिकिट कापण्यात ते यशस्वी झाले. पुढे ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात धडाधड प्रवेश तर दिलेच ते पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचार भाषणात फडणवीस यांच्या कधी ही न पाहिलेला दर्प पाहायला मिळाला. सत्त्तेसाठी हे ही करावे लागत असेल या भाबड्या विश्वासाने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी ते ही सहन केले. राजकीय कारकिर्दीची ५० वर्ष पूर्ण केलेल्या शरद पवारांवर चौफेर टीका करताना ही अनेकांना रुचत नसले तरी राजकारणात हे ही चालते असे समजून शांत राहणे पसंत केले, नेमके हे तर चुकले नाही ना असे अनेकांना वाटायला लागले आहे. 


निकाल लागल्यानंतर मिळालेल्या जागा लक्षात घेता फडणवीस संयमाने घेतील असे वाटले. परंतु दिवाळीमध्ये पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पांमध्ये पुन्हा तोच दर्प पाहायला मिळाला. त्यापुढे सर्वाधिक त्रास झाला तो रात्रीत झालेल्या शपथविधी नंतर... देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा संयम सुटला तो तिथेच. सत्तेसाठी अनेकजण काही ही करतात. त्यात देवेंद्र फडणवीस नसतील, हा भाबडा आशावाद मावळला. महाराष्ट्राच्या प्रगती मध्ये देवेंद्र फडणवीस एक मैलाचा दगड ठरतील हा भ्रम तर केंव्हाच दूर झाला, पण महाराष्ट्र झोपेत असताना फडणवीस यांनी घेतलेली शपथ पाहून हमाम मे सब नंगे याची प्रचिती सर्वानाच आली असेल हे मात्र नक्की...!