Maharashtra Kesari 2023 : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून मोठा वाद पेटला होता. माती विभागामधील सेमी फायनलमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या कुस्तीत महेंद्रला दिल्या गेलेल्या 4 गुणांवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. सिकंदर शेखच्या समर्थनार्थ सर्वांनी सोशल मीडियावर आवाज उठवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिकंदरला कमी गुण देत त्याच्यावर अन्याय झाल्याचं कुस्ती शौकिनांचं म्हणणं होतं. मात्र अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सातारचा पैलवान किरण भगत आणि बाला रफिक शेख यांच्यामधील कुस्तीमध्येही गडबड झाल्याचं बोललं जात आहे. किरणला खांद्याला दुखापत झाल्यावरही कुस्ती थांबवण्यात आली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सिकंदर शेखनंतर बाला रफिकच्या कुस्तीवरूनही वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


बाला रफिक आणि किरण भगत यांच्यामध्ये झालेल्या माती विभागातील कुस्तीमध्ये किरणचा पराभव झाला होता. बाला रफिक शेखने किरणला दुहेरी पट टाकत त्याला चितपट केलं होतं. ही कुस्ती अवघ्या 15 सेकंदात पार पडली होती. किरण भगत हा काही साधा मल्ल नाही. 2017 साली किरण भगतने महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र त्यावेळी त्याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावं लागलं होतं. 


यंदा किरणकडून सर्वांना अपेक्षा होत्या, सातारच्या तुफानी मल्लाची बाला रफिकसोबत कुस्ती होती. या कुस्तीमध्ये किरणचा काही सेकंदात पराभव झाला होता. मात्र व्हायरल व्हिडीओमध्ये, किरण भगतला दुखापत झाली तरी कुस्ती थांबवण्यात आली नाही असा आरोप केला जात आहे.



व्हिडीओमध्य तुम्ही पाहू शकता, पकड करायला सुरूवात केल्यावर बालाने काही क्षणात किरण भगतवर दुहेरी पट काढत डाव टाकला. यामध्येच भगतच्या हाताला दुखापत झालेली दिसत आहे. दुखापतीमुळे किरणने जोर लावला नाही पण त्या वेळेत बाला रफिकने त्याला आस्मान दाखवत 'विजयश्री' मिळवला. 


सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. मात्र स्पर्धेवेळी दुखापतीबाबत कोणतीही माहिती सर्वांसमोर आली नव्हती. आता कुस्ती थांबवण्यात आली नाही अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे.  किरण भगतने अनेक फड गाजवले असून बाला रफिक आणि त्याची जंगी कुस्ती होणार अशी आशा सर्वांना होती मात्र त्यावेळी दुखापत झाली अन् कुस्ती प्रेमी नाराज झाले. त्यासोबतच वाघासारखा चपळ मल्ल किरण भगतचं महाराष्ट्र केसरी 2023 ची गदा मिळवण्याचं स्वप्न भंगलं.