पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई :  १९५१ साली सुरु झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा....बिकिनी या ड्रेस प्रकाराला उत्तेजन देण्याचा हेतुने सुरु झालेली ही स्पर्धा पुढे मिस वर्ल्ड म्हणून प्रसिद्ध झाली. भारताला या स्पर्धेची ओळख झाली ती १९६६ साली....रिता फाऱिया यानी भारतासाठी पर्यायाने आशिया खंडाला सर्वप्रथम हा रत्नजडित मुकुट मिळवून दिला... इतिहास घ़डला होता...पुढे इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला तब्बल २८ वर्षे लागली...१९ नोव्हेंबर १९९४ ला एका संध्याकाळी ऐश्वर्या राय हे नाव जगाला परिचित झालं...पुढे डायना हेडन..युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि आता मानुशी...मिस वर्ल्ड चे सर्वाधिक मुकुट परिधान करण्याचा मान या सौंदर्यवतींनी भारताला दिला....


असा होता रिता फारियांचा प्रवास...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९६६ चा काळ तसा सर्वसामान्य स्त्रियांसाठी पोषक नव्हताच...परंतु रिता फारिया यांची पार्श्वभूमी गोवन असल्याने तुलनेने पुढारलेल्या विचारांची...ड़ॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेल्या रिता यांनी अगदी सहज म्हणून मिस बॉम्बे या स्पर्धेत सहभाग घेतला आणि विजेत्याही ठरल्या...त्याकाळी या स्पर्धेला आजच्याइतके ग्लँमर नव्हते...परंतु “मिस वर्ल्ड”हा मुकुट जिंकल्यानंतर रिता फारिया एका रात्रीत “स्टार” झाल्या... आपल्या जास्त उंचीमुळे  सातत्याने हिणवल्या गेलेल्या रिता फारिया यांनी यानिमित्ताने ग्लँमरच्या दुनियेत भारताला ख-या अर्थाने उंचीवर प्राप्त करुन दिली.


ऐश्वर्या आणि ग्लँमर ....


पुढे २८ वर्षांनी म्हणजेच १९९४ साली ऐश्वर्या राय चं नाव मिस वर्ल्ड म्हणून घोषित झालं...भारतात थेट गुंतवणुकीवर असलेली बंधनं शिथील होण्याचा तो काळ होता...या स्पर्धा म्हणजे सौंदर्यप्रसाधनांसाठी भारतासारखी मोठी बाजारपेठ काबीज करण्याचा डाव अशी टीकाही झाली... ऐश्वर्याच्या सौंदर्यांपुढे या टीका मात्र फारच फिक्या ठरल्या...ग्लँमर विश्वात जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणारं एक सुंदर चेहरा ऐश्वर्या रायच्या रुपानं भारताला मिळाला होता.. देश दहशतवादातून सावरत होता आणि तरुणाई गरीबीतून पुढे येउ पाहात होती. हा काळ फक्त स्वप्न पाहाण्याचा नव्हता ...तर हा काळ होता स्वप्नं जगण्याचा...त्या एका मुकुटाने भारतातील करोडो तरुणींना आत्मविश्वास दिला होता...पुढे जाण्याचा...स्वप्नं सत्यात उतरवण्याचा...


भारतीय सौंदर्याची खाण...


पुढे परंपरा सुरु राहिली..१९९७ साली डायना हेडन...१९९९ मध्ये मराठमोळी युक्ता मुखी आणि २००० साली प्रियांका चोप्रा..आणि त्यानंतर १७ वर्षांनी हा किताब पटकावणारी मानुशी छिल्लर .... या सहा सौंदर्यवतींनी स्वतचं वेगळं व्यक्तीमत्व घेउन भारताचं प्रतिनिधीत्व केलं...रिता फारिया यांचं सौंदर्य हे खरं भारतीय सौंदर्य..सावळा रंग आणि रेखीव चेहरा...ऐश्वर्या राय म्हणजे सौंदर्याच्या सर्व पातळ्यांवर चपखल बसणारी, सौंदर्याच्या टिपिकल व्याख्येत न बसणारी पण आत्मविश्वासाने वावरणारी प्रियांका...उंच व आकर्षक युक्ता मुखी...रिता फारियांप्रमाणेच सावळं सौंदर्य लाभलेली सावळी डायना हेडन....ब्युटी विथ पर्पझ हा सौंदर्यस्पर्धेंचा मुळ उद्देश या ६ भारतीय सौंदर्वतींनी कायम ठेवला.


या स्पर्धांनी दिला आत्मविश्वास...उमेद


या सौंदर्य स्पर्धांवर टीका होते, वादही होतात..पण मुद्दा केवळ सौंदर्य स्पर्धांचा नाही तर छोट्या शहरातून मोठं स्वप्न घेउन येणा-या करोडो तरुण तरुणींच्या आत्मविश्वासाचा आहे..या व अशा अनेक स्पर्धा स्वप्नं जगायला शिकवतात. आज प्रत्येक क्षेत्रात स्वतला सिद्ध करुन दाखवणा-या या पिढीला भारताचा अभिमान व्हायचंय...हरियाणवी २० वर्षीय मानुषी छिल्लर त्याचंच एक उदाहरण!