प्रशांत जाधव, संपादक, 24taas.com, मुंबई : नुकताच झी २४ तास आणि झी मराठी दिशा तर्फे “उत्सव मराठीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येत्या २७ फेब्रुवारीला हा कार्यक्रम झी २४तास या वृत्तवाहिनीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आपल्या रांगड्या आवाजात नंदेश उमप याने अक्षरश: अंगावर काटा येईल असे सादरीकरण केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरूवातीला “जय जय महाराष्ट्र माझा” गाणे म्हटले. अभिमानाने छाती फुलेल असे हे सादरीकरण.... नंतर मी फेसबूक लाईव्ह करण्यात गुंग होतो. १ दीड तासाने माझा सहकारी Prashant Anaspure नंदेशला शोधत आला. मी म्हटल सभागृहात नाही आहे तो... मग आम्ही रंगभूषा खोलीकडे जात असताना प्रशांत मला म्हणाला अरे त्याला १०४ ताप आहे. तरी तो सादरीकरण करतोय.


मी क्षणभर उडालोच. मला प्रशांतच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. रविंद्र नाट्यमंदिरातील प्रत्येक खोली आम्ही पाहत होतो. त्यातील एका खुर्चीवर बसून दुसऱ्या खुर्चीवर पाय मोकळे सोडून बसलेला नंदेश पाहिला. त्याने प्रशांत अनासपुरेला पाहिले, तो उठून उभा पण राहू शकत नव्हता. त्याने तसाच प्रशांतशी हात मिळवला. मग प्रशांतने माझी ओळख करून दिली.


त्याचा हात हातात घेतल्यावर मला चटका बसला. तो १०४ तापाचा होता. या व्हायरल ( चुकून इंग्रजी शब्द वापरला, संसर्गजन्य अती भयानक वाटतो) तापामुळे त्याचे सांधे आणि पाठ दुखत होती. तो बोलतांना कण्हत होता. त्याने सांगितले की तापामुळे डोळ्यातून वाफा येताहेत. असह्य होतं.


आम्ही सांगितलं एका खोलीत सोफा आहे. पण तो म्हटला झोपल्यावर आणखी त्रास होईल. तसंच कपडे चुरगळतील.. मग त्यांने रविंद्रच्या समोर असलेल्या मेडिकलमधून गोळ्या मागविल्या होत्या. त्याची वाट पाहत होता.


१०-१५ मिनिटांनी त्याचा सहकारी आला. त्याने एक सँडविच आणले. ते पण त्याने पूर्ण खाल्ले नाही. मला आणि प्रशांतला आग्रह केला. मला वाटले की आजारी माणसाला गोळी घ्यायची आहे. म्हणून मी आणि प्रशांतने नकार दिला. पण ऐकेल तो नंदेश कुठे....आम्ही सँडविचमधील एक तुकडा उचलल्याशिवाय पठ्ठ्यानं स्वत: खाल्ले नाही. त्याच्या समाधानासाठी आम्ही तो तुकडा खाल्ला.


त्याने मग अनेक प्रकारच्या गोळ्या घेतल्या. आणि पहाडी आवाजाचा हा मर्द गडी पुन्हा आपल्या पुढील सादरीकरणासाठी सज्ज झाला.


मग त्याने शेवटची माझी मैना... हे गाणे म्हटले. गाण्यात त्याने जे भाव ओतले होते. आ.. हा.. हा... डोळ्यात अंगार, मनांत हुरहूर हे सर्व दिसत होतं आणि मी ते अनुभवत होतो. कलाकार म्हणून विठ्ठलदादा उमप यांच्या प्रती जितका आदर आहे. तितकाच आदर नंदेशच्या बाबतीत निर्माण झाला.


सच्चा कलाकार म्हणून तुला नंदेश मानाचा मुजरा...


माझी मैना...नंदेश उमप यांचा तगडा परफॉर्मन्स...पाहा खास व्हिडीओ