गुलफाम का डर !
भारत हा एक उदारमतवादी देश आहे असं मला वाटत.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई
प्रिय नसीरुद्दीन शाह,
तुम्ही एक बुद्धिवान कलाकार आहात त्यामुळे तुमचा नेहमीच आदर वाटतो. शोले हा तद्दन बोगस चित्रपट आहे, राजेश खन्ना हा दर्जाहीन अभिनेता होता तर विराट कोहली जगातील सर्वात वाईट स्वभाव असलेला क्रिकेटपटू आहे या तुमच्या तिन्ही मतांशी मी एकदम सहमत आहे. पण भारतातील सध्याची स्थिती काळजी करणारी आणि तुमच्या मुलांसाठी चिंतादायक झालीय या तुमच्या विधानांशी मी अजिबात सहमत नाही. उलट नसिरुद्दीन शाह किंवा आमिर खानची मुलं म्हटल्यावर लोक (कोणत्याही धर्माचे) त्यांच्याकडे बुद्धिवान म्हणून पाहतील आणि त्यांचं कौतुकच करतील. भारत हा एक उदारमतवादी देश आहे असं मला वाटत. या देशात तुम्ही देव, पंतप्रधान यांनाही शिवीगाळ करु शकता. आपल्या देशाला नाव ठेऊ शकता. आपलं मत ठाममते मांडू शकता. रस्त्यावर थुंकू शकता आणि रुळाच्या कडेला शौचालयालाही बसू शकता (अर्थात ही गरीबी आणि मागासपणा झाला तरीही, कारण काही देशात दंड आकारला जातो) अब्दुल कलाम सारख्या चांगल्या मुस्लिम व्यक्तीला राष्ट्रपती बनवलं जात आणि ते सर्व धर्मियांचे आदर्श ठरतात.
अनेक खान कलाकार बॉलीवूडवर राज्य करतात. तर क्रिकेट संघाचा कर्णधार कधी काळी मुस्लिम व्यक्ती होता. हिंदू किंवा इतर धर्मातील महिला मुस्लिम किंवा इतर धर्माच्या व्यक्तिशी विवाह करू शकतात किंवा एखादी महिला अनेक सामाजिक बंधन झुगारून बिनधास्त राहू शकते. लोक देवही ( संकल्पना) नाकारू शकतात. तरीही त्यांच्या विरुद्ध कोणी फतवे काढत नाहीत. मंदिरात कोणत्याही धर्माची व्यक्ती जाऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं स्वातंत्र्य अनेक सामाजिक बंधन असूनही भारतात मिळतात.
भारत मेरा महान आहे की नाही ठाऊक नाही. मात्र हा भारत काही कट्टरवादी देशांपेक्षा नक्कीच अधिक स्वातंत्र्याने जगण्याचा हक्क देतो. त्याचा आदर करा त्याची किंमत ठेवा एवढंच...( अर्थात काही बाबी घटना निषेधार्हचं आहेत. काही बाबी आक्षेपार्ह किंवा निर्बंध लादणाऱ्या नक्कीच आहेत आणि त्या कायम राहतीलही. याचबरोबर वाद, मतभेद आणि चर्चाही सुरू राहील प्रगती अशीच घडत असते)
आभार,
एक अतिसामान्य नागरिक !