एक स्टेशन, एक तारीख, चाळीस मृत्यू
ही शोकांतिका परळमधली... आपल्या मराठी माणसाच्या परळमध्ये घडलेली... एलफिन्स्टन पूल आणि कमला मिल.... एकमेकांपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरचे..
स्नेहा अणकईकर, झी मीडिया, मुंबई : ही शोकांतिका परळमधली... आपल्या मराठी माणसाच्या परळमध्ये घडलेली... एलफिन्स्टन पूल आणि कमला मिल.... एकमेकांपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरचे..
29 सप्टेंबरला एलफिन्स्टन पूलावर चेंगरुन माणसं मेली....
29 डिसेंबरला कमला मिलमध्ये गुदमरुन माणसं गेली....
29 सप्टेंबरला ऑफिसला गेलेलं कुणाचं तरी जिवलग माणूस संध्याकाळी घराकडे परतलंच नाही....
आणि 29 डिसेंबरला रात्री पार्टी करायला गेलेल्यांसाठी दुसरा दिवसच उजाडला नाही....
लोकलच्या धावपळीतला मुंबईकर स्वप्नांचा पाठलाग करता करता मेला....
आणि मोजो पबमधला तो दक्षिण मुंबईकर पबमध्ये होरपळून मेला....
वर्ष सरता सरता या शहरानं आणखी चौदा बळी घेतले.....
गेल्या वर्षांत या स्वप्नांच्या नगरीत सव्वाशे ते दीडशे माणसं किड्या, मुंगीसारखी मेली...... इथली माणसं रेल्वेखाली चिरडून मरतात, फुटपाथवर झोपलेले गाड्यांखाली येता, चेंगराचेंगरीत गुदमरतात, बिल्डिंगच्या ढिगा-यात खचतात, आगीत होरपळतात, मॅनहोलमध्ये पडतात, कोसळणाऱ्या झाडांखाली येतात....
हे बळी गाफील यंत्रणेचे, मुर्दाड प्रशासनाचे, निगरगट्ट व्यवस्थेचे, बेजबाबदार आणि भ्रष्ट अधिका-यांचे, उन्मादाचे, उन्मेषाचे ,पैशाच्या माजाचे..... दिवसांगणिक हा आकडा फक्त वाढतोय..... आणि त्या वाढणा-या आकड्यांबरोबर आमची असंवेदनशीलताही वाढतेय..... इतक्या आगी मुंबईत आतापर्यंत लागल्या, पण आम्ही त्यातून सुधारलो नाही... गेल्या वर्षात मुंबईतल्या आगीत 39 माणसं हकनाक मेली, साकीनाक्यात त्या आगीनं बारा मजुरांना गाठलं, आणि पबमध्ये उच्चभ्रू घरातल्या पोरांनाही मृत्यूच्या खाईत लोटलं.... भेंडीबाजार आणि घाटकोपरमधल्या बिल्डिंग पत्त्यासारख्या कोसळल्या, त्यात ६२ लोकांना आपण गमावलं.... एल्फिन्सटनच्या चेंगराचेंगरीत २३ जण गेले, आणि झाडं पडून सहा मुंबईकर मेले..... एखादं एलफिन्स्टन किंवा कमला मिल झालं की फायर ऑडिटची आणि पूलाच्या रिॅऍलिटी चेकची नाटकं होतात..... राजकीय नेत्यांचे दौरे आणि सहानुभूतीच्या ट्विटसचा पाऊस पडतो..... आग प्रतिबंधक नियम आपण खरंच पाळतो का, बांधकामांचे सगळे नियम आपण गांभीर्यानं घेतो का.... शहरांवरचा ताण वाढतोय, प्रशासनावरचा वाढतोय..... कायद्यातले नियम तर धाब्यावर बसवायला आम्ही कधीच शिकलो.... आता आमच्या संवेदनापण खुंटीला टांगून ठेवल्यायत..... एका स्टेशनवर इतका ताण आम्हाला जाणवतोय..... कित्येक वर्ष...... पण नवा पूल उभा करण्यासाठी 23 लोकांची थडगी आधी बांधावी लागतात, हे दुर्दैव.... हे बळी वेगाचे.... सतत वेग हवाय...
विकासाचा....... म्हणूनच गेल्या अवघ्या दोन वर्षांत कमला मिलमध्ये 32 पब्ज उभे राहतात.... बक्कळ पैसा दिला की सगळं काही नियमांत बसतं.... त्या पैशाच्या उन्मादातच आम्ही त्या पब्जकडे ओढले जातो.... सेलिब्रेशनची झूल पांघरुन नाचताना आणि फेसाळलेले दारूचे ग्लास एकमेकांवर आदळताना ही रात्र आपल्याला शेवटाकडे घेऊन जातेय, याचं भान कुणालाच उरत नाही.... चार पैसे सरकवले की सगळं नियमित करुन घेता येतंय.... पैशाच्या या देवाणघेवीत अशा किती मृत्यूंचं कंत्राट दिलं आणि घेतलं जातंय..... हप्तेखोरी आणि चिरीमिरीच्या खेळात एकदा का गेंड्याची कातडी पांघरली की काही बोचंतच नाही... टोचतच नाही......
मुंबईच्या रस्त्यांवर मरण स्वस्त झालंय... आकडा वाढतोय, अकरा, बारा, तेरा, चौदा, तेवीस.....पण आम्हाला सोयरसुतक नाही.... 29 सप्टेंबर, 29 डिसेंबर या फक्त तारखा झाल्या..... या तारखांनी अनेक माणसं काळाच्या पडद्याआड नेली.... थंड काळजानं आम्ही मृत्यू पाहातो, त्यावर चर्चा करतो, फार तर त्यांच्या श्रद्धांजलीच्या आणि RIP च्या पोस्ट फॉरवर्ड करतो........ हळहळ व्य़क्त करुन झाली की दरवेळी मुंबईकरांचं स्पिरीट म्हणून स्वतःचंच कौतुकं करुन घ्यायचं..... वेळीच या सगळ्याकडे डोळसपणे पाहावं लागेल...... माणूस म्हणून माणसांकडे बघावं लागेल..... नवं वर्ष उंबरठ्यावर थांबलंय... यानिमित्तानं तरी संकल्प करुया माणूस होण्याचा.....