ब्लॉग : `पिंपरी चिंचवड परगण्यात राम लक्ष्मण भिडले....?`
स्वकीयांनाच नामोहरण करण्यात यशस्वी झाल्याच्या आनंदात राजे लक्ष्मण चंद्ररंग महालाच्या शामियान्यात निद्रिस्त झाले...!
कैलास पुरी, झी मिडीया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परगण्यावर निराशेचे काळे ढग जमा झाले....! गेली चार वर्षे आकाशात तळपणारा सूर्य अचानक निराश, काळ्या ढगांच्या आड निषतेज झाला...! राज्यातील जनताही हवालदिल झाली...! संपूर्ण वातावरणावर एका भयाण निराशेच सावट जाणवू लागले...! काय झाले कुणाला काही कळेना...! स्वप्नवत वाटणाऱ्या नगरीत हे भयाण वातावरण तयार कसे झाले याचा अंदाज कुणाला येईना....! तेवढ्यात शहराच्या राजकीय पटलावर वाऱ्यासारखी वार्ता पसरली...! महामारीत आरोग्य खात्यात 'वैद्य' भरण्यावरून रामाला अडचणीत आणले आहे...! इच्छा नसताना 'वैद्य' भरती प्रक्रिया झाली आणि राम अर्थात महेश उद्विग्न झालाय आणि त्याने पिंपरी चिंचवड परगण्यातील कमळाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतलाय...! वातावरणात निराशा का पसरलीय याची जाणीव जनतेला झाली...!
...भोसरी संस्थानात हालचाल सुरू झाली. राजे राम अर्थात महेश यांचे पाठीराखे जमू लागले...! संतापाने लाल होत एक सेनापती म्हणाला आमच्या राजाचे घर भोसरीकरांच्या हृदयात...! त्याच्यावर दबाव आणण्याचे धाडस तरी कसे झाले...! एवढी ही बिशाद चिंचवडकरांची....! राजे लक्ष्मण तुमचा आणि तुमच्या पाठीराख्यांचा पक्ष कमळ..! भोसरीकरांचा पक्ष फक्त राजे राम अर्थात महेश...! अपमान होत असेल दबाव येत असेल तर नको ते कमळ...! अरे बारामतीच्या भानामतीला आम्ही डगमगलो नाही तिथं इतरांची काय बिशाद...! सर्व पाठीराख्यांचा हा संताप होत होता मात्र राजे राम अज्ञातवासात होते....!
..तिकडे राजे लक्ष्मण आणि त्यात गेल्या काही महिन्यांपासून दाखल झालेल्या 'थ्री एडियट्स' ने कोथरूड श्रेष्टींशी चर्चा करत आपली बाजू मांडत आम्ही महामारीच्या काळात 'वैद्य' भरती प्रक्रिया कशी गरजेची ही स्पष्ट केले...! कोथरूड श्रेष्टींचा निरोप आला आणि उद्विग्न झालेल्या राजा रामाला एक पाऊल मागे घ्यावे लागले.
..कसलाही बाका प्रसंग आला की त्याचे संधीत रूपांतर करणारा राम यांचा चाणक्य कार्तिक ही या वेळी थोडासा भांबवलेला होता...! झाली घटना फायद्याची की तोट्याची याचा अंदाज त्याला बांधता येईना...! म्हणून शक्य तेवढी ही वार्ता प्रसारीत होऊ नये याची व्यवस्था त्याने केली...! पण वार्ता लपणार ती कशी...! ती बाहेर पडलीच...! राजे राम अर्थात महेश यांचे अष्टप्रधान मंडळ चाणक्यासह विचार विनिमयाला बसले...! या राजीनामा अस्त्राचा काही उपयोग नाही याचा अंदाज त्यांना आला आणि असं काही घडलेच नसल्याचं अष्टप्रधान मंडळात पक्के झाले...! तो पर्यंत अज्ञातवासातून परत आलेल्या राजे राम यांनी जाहीर प्रकटन काढत आम्ही कमळ प्रांताचे नेतृत्व सोडत असल्याची अफवा असल्याचे स्पष्ट केले...! चाणक्याच्या धीर आला..
...रात्र प्रहराला सगळे वातावरण पूर्ववत होऊ लागले...! वातावरणातील निराशा दूर होऊ लागली, चंद्राचा शीतल प्रकाश पिंपरी चिंचवड परगण्यावर पसरू लागला आणि जनतेने निःश्वास सोडला...! जरी राजीनामा नाट्य अफवा असल्याचं चित्र आपण निर्माण केले असले तरी आता लक्ष्मणाशी पहिल्यासारखा सूर जुळण्याची शक्यता नाही या विचाराने राजा राम अर्थात महेश हवालदिल झाला तर तिकडे पुन्हा एकदा आपण स्वकीयांनाच नामोहरण करण्यात यशस्वी झाल्याच्या आनंदात राजे लक्ष्मण चंद्ररंग महालाच्या शामियान्यात निद्रिस्त झाले...!
(नुकत्याच शहरात न झालेल्या राजीनामा नाट्यावर आधारित...!)