कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी चिंचवड : गेले काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरात कमालीचा बदल जाणवू लागलाय. अर्थात हा बदल डोळ्यांना आनंद देणारा ठरतोय. शहराच्या बहुतांश भागात महापालिकेच्या भिंती अक्षरशः बोलू लागल्या आहेत. स्वच्छतेचे संदेश देणारी भित्ती चित्रं नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दृश्य भागात असणाऱ्या झोपडपट्ट्यांवर ही आकर्षक रंग रंगोटी केलेली दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांनी स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कधी नाही ते पिंपरी चिंचवड मधल्या नागरिकांना ओला आणि सुका कचरा विलगीकरण करण्याची सवय लागल्याचे चित्र आहे. ही बाब खरेच समाधानाची म्हणावी लागेल. 


अर्थात शहराच्या बदलेल्या या रूपाचे श्रेय द्यावे लागेल ते आयुक्त राजेश पाटील यांना. या पूर्वी ही शहरला अनेक चांगले आयुक्त लाभले, अनेकांनी चांगले काम केले. पण राजेश पाटील यांनी एक लक्ष्य ठेवत कामाची आखणी केल्याचे स्वच्छ सर्वेक्षणाच्या सुरु असलेल्या कामामांवरून वाटते. कोणत्याही परिस्तिथीत शहराला स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकाचे शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पहिले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक योजना अवलंबलय आहेत.


एखादे ध्येय डोळ्यसमोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी या पद्धतीने झटणारा आयुक्त शहराने कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल. या पूर्वीचे आयुक्त दिलीप बंड यांच्या काळात शहराच्या विकासात आमूलाग्र बदल झाला. आशिष शर्मा, श्रीकर परदेशी परदेशी यांनी ही आपल्या कामाचा ठसा उमटवला. राजेश पाटील हे ही आता शहरावर ठसा उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत हे त्यांच्या प्रयत्नावरून दिसत आहे.           


स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारलेल्या इंदोर शहरात झालेल्या कामाचा अभ्यास करत त्याच धरतीवर पिंपरी चिंचवड मध्ये काम करण्याचे धोरण राजेश पाटील यांनी ठेवलंय. अर्थात इंदोर शहराची हुबेहूब नक्कल करण्याची गरज नाही हे ही तितकेच खरे. इंदोर शहराला देशात प्रथम क्रमांकाचे शहर होण्यासाठी पाच वर्ष लागली. आयुक्त राजेश पाटील ते एका वर्षात पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला कितपत यश येते हे पाहणे महत्वाचे आहे. एकीकडे राजेश पाटील यांचे हे प्रयत्न सुरु असले तरी शहरात सगळेच आलबेल आहे असे नाही.


दृश्य भागात झोपडपट्टी रंगात न्हाहून निघालेली दिसत असली तरी त्याच झोपडपट्टीत दूरवर गटर तुंबल्याचे, सार्वजनिक शौचालय दुरवस्थेचे चित्र आहे. पिंपरी सारख्या गावात मोकाट जनावरांचा प्रश्न अजून ही कायम आहे. भर रस्त्यात असंख्य जनावरे बस्तान घाण करतानाचे चित्र नित्याचे आहे. या भागातून गाडी चालवताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


काही काही भागात सुरु असलेली रस्त्याची कामे गेली कित्येक महिने सुरु आहेत. सुरुवातीला तयार केलेले सिमेंटचे रस्ते काम पूर्ण होईपर्यंत पुन्हा खराब होण्याच्या स्तिथीत आहेत. रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा, खड्डे यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला समोरे जावे लागत आहे. शहर म्हंटले की समस्या आल्याच, हे खरे. पण त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालणार नाही.


त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी या समस्यांकडे ही लक्ष देण्याची गरज आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात ठसा उमटवण्याच ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय ते नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रयत्नातून शहराने खरेच चांगली कामगिरी केली तर त्याचे नक्कीच कौतुक होईल.