पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : रोज दैनंदिन जीवनात अऩेक समस्या उद्धभवत असताना,  त्यात शिक्षण हे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे की, काय असं वाटायला लागलं आहे. कारण शिक्षण क्षेत्रातील चाललेलं बाजारीकरण, वाढलेली फी, शाळेत मुलांवर होणारे अत्याचार, वाढणार अभ्यासाचा ताण, मार्क चांगले पडायला पाहिजे, हा पालकांचा अट्टहास, प्रत्येक विषयात मुलं परिपूर्ण असावेत, कुठेही मुलं मागे नसावे, आणि शिक्षण चांगलं मिळावं, म्हणून परिस्थिती नसताना इंग्रजी शाळेत टाकण्याचा पालकांचा अट्टहास, हे सर्व पाहता शिक्षण क्षेत्रात चालय तरी काय? असा मोठा प्रश्न मनाला पडल्या शिवाय राहत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे, मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. एवढा मराठी भाषाला इतिहास असताना, मराठी शाळेत आज विद्यार्थी संख्या पाहिली तरी मराठी शाळाचं अस्तित्व काही दिवसात राहतं की नाही हा मोठा प्रश्न आहे.


का झाली मराठी शाळांची बिकट अवस्था..


काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या रेट्यामुळे मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. परंतु ही पडझड जेव्हा सुरू झाली, तेव्हा या प्रश्नाकडे आपण गंभीरपणे पाहिले नाही. आजच्या घडीला तथाकथित पांढरपेशा आणि मध्यमवर्गांतील पालक आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घालत नाहीत. याचा परिणाम मराठी माध्यमाच्या शाळांवर होतो आहे. 


मराठी समाजाने मराठी शाळांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे ही बिकट अवस्था आली आहे. ज्या पालकांचे संपूर्ण आयुष्य मराठी शाळेच्या माध्यमातून घडले तेही आपल्या मुलांना मराठी शाळेत घालायला तयार नाहीत. 


मातृभाषतून शिक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत. मराठी माध्यमातील शाळांच्या भवितव्याबाबत नेमके वास्तव काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणे हे आजही योग्यच आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आज प्रत्येक क्षेत्रात उंची गाठलेली आहे. 


मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही ही उंची गाठणे त्यांना शक्य झाले. पण, त्यांनी ही कीर्ती मिळवल्यानंतर निदान आपल्या मुलांना तरी शाळांमधून शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे गरजेचं आहे . मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेला विद्यार्थी मराठी शाळांपासून दूर गेला आणि खऱ्या अर्थाने मराठी शाळांच्या दूरवस्थेला सुरुवात झाली. 


इंग्रजी शाळांचं फ्याड..


मराठी माध्यमातून शिक्षणाचा स्तर चांगला होता आणि आजही चांगलाच आहे. आधी या शाळांमध्ये प्रत्येक इयत्तेच्या अनेक तुकड्यांमध्ये भरपूर विद्यार्थ्यी असायचे. आता अनेक मराठी शाळांमध्ये दोन तुकड्या भरायची मारामार झाली आहे. तर, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मात्र उलटे चित्र पाहायला मिळत आहे. 


परिसरात इंग्रजी शाळा नसेल, तर लांबच्या शाळेत प्रवेश घेऊ, पण शाळा इंग्रजी माध्यमाचीच असली पाहिजे, हा पालकांचा हट्ट मराठी शाळेचे भविष्य धोक्यात आणणारा आहे. अशा वेळी, मराठी मध्यमवर्गीय पालकांची शाळेच्या मुलाखतीत होणारी मानहानी, अपमान पचवूनही, ते लाखो रुपयांची देणगी देऊन आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. हे सर्व शहरातच चालेल आहे. असं नाही ग्रामीण भागातही या इंग्रजी शाळांचं फ्याड मोठ्या प्रमाणात पाहयाल मिळतंय. 


दोन्ही भाषा येणे महत्वाचं...


आजच्या घडीला पालकांचे असे ठाम मत झाले आहे की, आपल्या मुलांचे/मुलींचे शिक्षण जर इंग्रजी शाळेत झाले असेल, तर त्याला नोकरीत प्राधान्य मिळते आणि म्हणूनच पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. 


इंग्रजी येणे गरजेचे आहे, कारण ती जगन्मान्य अशी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. जागतिक पातळीवरील सर्व व्यवहार इंग्रजीतूनच चालतात. पण याचा अर्थ असा नव्हे की आपल्या मराठीकडे म्हणजेच मातृभाषेकडे त्यांनी पाठ फिरवावी. 


इंग्रजी येणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच आपली मातृभाषा मराठी येणे महत्वाचे आहे. इंग्रजी ही व्यावहारीक भाषा आहे, ती तर आलीच पाहिजे, पण त्याच बरोबर मराठी आपल्या मनाची, भावनांची भाषा आहे आणि ती व्यवस्थित येणे, हे तेव्हढेच किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. मुलांचा गोंधळ होऊ नये, म्हणून दोन्ही भाषा व्यवस्थित येणे याला खूप महत्वाचे आहे.


मराठी शाळेत शिक्षण घेतलेली मोठे व्यक्ती...


आज आपण पाहतो की, मराठी शाळेमध्ये शिक्षण घेऊन अनेक महान व्यक्ती यशस्वी झालेले आहेत. की ज्यांच्याकडे शिक्षणसाठी पैसे नव्हते परंतु जिद्दिने कष्टाने मराठी शाळेत शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.


डॉ. नरेद्र जाधव, डॉ.माशेलकर, तुकाराम मुंडे, अन्सार शेख, यांच्यासह अनेक जणांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं आणि नावलौकिक मिळवला.


पालकांनी का फिरवली मराठी शाळांकडे पाठ?


जे पालक मराठी शाळेत शिकले, ते आता आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत का पाठवतात, याचा ही विचार करणे आवश्यक आहे. शहरातील, गावातील मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली असून, ज्या प्राथमिक सोयी-सुविधा शाळांमध्ये असायला हव्या, त्या शाळांमध्ये दिसून येत नाहीत.  


शाळांमधील स्वच्छता, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडा मैदान अशा सुविधांची स्थिती दयनीय अवस्थेत आहे. तसेच मराठी शाळांमध्ये मुलांकडे व्यवस्थित पाहिजे तसे व्यक्तिगत लक्ष दिले जात नाही. म्हणूनच की काय मराठी शाळांमध्ये या सुविधा नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये पाठविणे पसंत केले आहे. 


इंग्रजी शाळेमध्ये मात्र सर्व मुलांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जाते.आणि सर्व एक्डीवीडींकडे बारकाईन लक्ष दिले जाते.इंग्रजी शाळेमधील इमारत पासून ते मुलांचा ड्रेस, शुज,त्यांचा अभ्यास,आणि वेळोवेळी होणारे शाळेत एक्डीवीडींज आणि त्या एक्डीवीडींजमुळे मुलांना प्रोत्सहान दिले जाते. 


आशा कार्यक्रमामध्ये मुलांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जात. शाळा सुरु होताना शाळेत मुलांची संख्या वाढावी, म्हणून मार्केटिंग केले जाते. यामुळे पालकांचं इंग्रजी माध्यमांकडे आपोआप लक्ष वेधलं जातं.  पालककडे पैसे नसतानाही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यामामध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी पैशाची जमवाजमव करुन इंग्रजी माध्यमामध्ये मुलांन पालक टाकताना दिसतात.


मराठी शाळांच्या अवस्थेला काही प्रमाणात समाजही जबाबदार आहे. समाजानेच मराठी शाळांचा पाठिंबा काढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, आज ज्याप्रमाणे मराठी शाळांच्या त्रुटींबद्दल चर्चा केली जाते तशी चर्चा इंग्रजी शाळांबाबत का केली जात नाही, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत.


मराठी माध्यमांच्या शाळांबाबतचे प्रश्न हा सध्या ऐरणीवरील विषय आहे. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्या लोकांनी मराठी शाळेंमध्ये शिक्षण घेतले त्यांना पुढे येण्याची गरज आहे. नाही तरी काही दिवसांनी मराठी शाळा होत्या, हे मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेणाऱ्यांनाच सांगावे लागेल.