Blog : रुपेरी पडदा धूळ का खातोय? सिनेमाचे अर्थकारण खरंच बिघडलं का...
चित्रपटांचा जनमाणसावर कुठे जास्त प्रभाव दिसत असेल तर त्यात भारताचे नाव प्रामुख्याने पुढे येईल.
प्रतिक्षा बनसोडे, झी मीडिया, मुंबई : जगात जर चित्रपटांचा जनमाणसावर कुठे जास्त प्रभाव दिसत असेल तर त्यात भारताचे नाव प्रामुख्याने पुढे येईल. त्यातही बॉलीवूडच नाव प्रथम घेता येईल. अर्थात टॉलीवूड,मराठी सिनेइंडस्ट्री आणि इतर प्रादेशिक सिनेजगत यांच योगदान नाकारता येणार नाही. पण खऱ्या अर्थाने हिंदी भाषेचा प्रसार भारतात आणि भारतीय उपखंडात कोणी केला असेल तर तो हिंदी सिनेमाने.
जवळ जवळ 100 वर्षाचा इतिहास असलेली ही सिनेसृष्टी ही गेल्या काही वर्षात स्थित्यांतराच्या अवस्थेत दिसते आहे. त्यातच कोरोनानंतर या हिंदी सिनेसृष्टीला जवळजवळ ओहोटी लागल्याचे चित्र दिसतंय. पण यामागची नेमकी कारण काय असावीत याचा आढावा घेणे गरजेचे आहे. इतक्या वर्ष जनसामान्याच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रुपेरी पडदा अचानक धुळीत का जाऊ लागला हे पाहणे गरजेचे आहे.
बदलते जग आणि मनोरंजनाची साधने
आपले आजी-आजोबा हे रेडिओवरच्या "बातम्या" ऐकत होते. आपले आई वडील "बातम्या" टेलिव्हिजन (दूरदर्शन)वर पाहत होते. आता आपली पिढी आहे जी "बातम्या" बहुतांश मोबाईलवर आणि विशेषतः यूट्यूबवर बातम्या पाहते. युट्यूबचा वापर करणारे लोक ऐकूण लोकसंख्येच्या 16% आहे.
सगळ्यात जास्त युट्यूबचे प्रेक्षक हे आपल्या देशात आहेत तर ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करणारी प्रेक्षकांची संख्या दिवसागणिक वाढत चाललेली आहे. आजची पिढी ओटीटीवर वेबसिरीज आणि यूट्यूब,सोशल मीडिया या मनोरंजनाच्या साधनाभवती गुरफटत चालली आहे. चित्रपट,बातम्या,मालिका हे मनोरंजनाचे प्रकार तेच आहेत पण ते लोकांपर्यंत पोहचण्याची माध्यम काळानुसार बदलत गेली.
खरंतर हेच नेमक हिंदी चित्रपटांच्या बाबतीत घडतय. लोकांचा ओढा ओटीटी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे वाढला असताना, लोकांनी चित्रपटगृहामध्ये येऊनच चित्रपट बघावा ही अपेक्षा करण मूर्खपणाच ठरेल. कारण कोरोना काळात सर्व थिएटर बंद असताना लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे मोर्चा वळवला आणि लोकांचे मनोरंजनाचे माध्यम आणि सवय दोन्ही बदलले.
तसं पाहता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा, वेबसिरीज पाहणे हे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा स्वस्तच आहे. आता ही गोष्ट जितक्या लवकर चित्रपट निर्मात्यांना कळेल आणि त्यानुसार ते योग्य काळानुरूप बदल करतील तितकी परस्थिती लवकर बदलेल नाहीतर, एकामागे एक चित्रपट आपटत राहतील.
महागाई,बेरोजगारी आणि मध्यमवर्ग
हिंदी चित्रपटांना डोक्यावर घेणारा आणि हाऊसफुल्ल करणार कोण असेल तर तो मध्यम आणि निम्न-मध्यम वर्ग. गेल्या काही वर्षांत आपण पाहिले तर खासकरून कोरोनानंतर महागाई आणि बेरोजगारी यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते.
मला कायम वाटत की चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणे हे सुखविलासीपणाचे लक्षण आहे. कारण आपल्या मूलभूत गरजा आणि सर्व घरखर्च भागवून जो पर्यंत ज्यादाचे पैसे खिशात राहत नाही. तो पर्यंत सर्वसामन्यांचे पाऊल सिनेमागृहाकडे वळणार नाही.
पण आताची सर्वसामन्यांची परिस्थिती अशी आहे की 'चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला',जर सर्वसामन्यांना दैनंदिन खर्च भागवण अवघड होत असेल तर चित्रपट पाहणे दूरची गोष्ट आहे.
एक सोपं उदाहरण देतो आपल्यापैकी अनेक जणाकडे 2 सिम असतील पण आपल्यापैकी कितीजण दोन्ही सिममध्ये महिन्याला रिचार्ज करतात? कदाचित खूप कमी लोक असतील. कारण आता महिन्याचा रिचार्ज जवळजवळ 200 रुपये झाला आहे. त्यात दोन्ही सिम रिचार्ज करणं म्हणजे 400 रुपये खर्च.
आता जो माणूस 200 रुपयेचा रिचार्ज करताना दहा वेळा विचार करतोय तो 200 -300 ची तिकीट काढून थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहील का? मला वाटत नाही पाहील. त्यामुळे महागाई आणि बेरोजगारी ही सर्वात प्रमुख कारण आहेत ज्यामुळे लोकांचा ओढा सिनेमागृहाकडे कमी झाला आहे.
राजकारण आणि कुरघोडी
हिंदी सिनेसृष्टीत गेल्या काही वर्षांचा आढावा आपण घेतला तर दिसून येत कीदोन गट पडलेले दिसतात. यातच राजकीय हेतूने पुरस्कृत अनेक चित्रपट दिसतात. यात राजकारणी मंडळीसाठी प्रचार करणे त्यांची विचारधारा मांडणे आणि जे त्यांच्या विरोधात असतील त्यांच्या चित्रपटाविरोधात सोशल मीडियाद्वारे बहिष्कार टाकणे किंवा ट्रोलिंग करण या गोष्टी सर्रास दिसतात.
दुर्दैवाने इथला मोठा बहुसंख्यवर्ग सोशल मीडियाच्या आहारी गेला असून.जे सोशल मीडियावर सांगितल जात ते सगळ खरच आहे.असा समज बहुसंख्य लोकांचा असल्याने इथ विकृत प्रचारतंत्र यशस्वी ठरते. त्यामुळे राजकीय हेतू पुरस्कृत प्रचार हे सध्या तरी सिनेमासाठी धोकादायक ठरत आहे असच चित्र सध्या आहे.
त्यात अजून भर म्हणजे सिने इंडस्ट्रीतही मोठयाप्रमाणात घराणेशाही,वशिलाबाजी,गटबाजी आणि अंतर्गत वाद या गोष्टीही अधोगतीसाठी कारणीभूत आहेतच.
गुणवत्तापूर्ण कलाकृतीचा अभाव
मराठी आणि टॉलीवूड इंडस्ट्रीत वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट येत असताना,हिंदी चित्रपट मात्र 80-90 च्या दशकातील कथानकात अजूनही अडकलेला दिसतोय. तेच तेच चेहरे,तीच रटाळ स्टोरी, हॉलीवूड आणि टॉलीवूड चित्रपटांची नक्कल या गोष्टी खरतर हिंदी चित्रपट आपटायला कारणीभूत ठरता आहेत अस म्हंटल तरी काही वावगे ठरणार नाही.
जाता जात इतकंच जर इथला प्रेक्षक हॉलीवूड आणि टॉलीवूड चित्रपट डोक्यावर घेत असतील आणि हिंदी चित्रपट आपटत असतील तर हिंदी चित्रपटांना अद्यावत होण्याची गरज नक्कीच आहे.
आपण एकंदरीत सध्याच्या परस्थितीचा आढावा घेतल्यास वरील 4 प्रमुख कारण हिंदी सिनेसृष्टीच्या अधोगतीसाठी कारणीभूत ठरत आहेत असच दिसतय. जर हिंदी सिनेसृष्टीने काळानुसार बदल नाही केले तर येणारा काळ हिंदी सिनेसृष्टीसाठी खूप कठीण असणार एवढ निश्चित.