`रेजांग ला`ची शौर्यगाथा
`रेजांग ला`वर काय घडलं होतं?
अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून चीन आणि भारत यांच्यात पूर्व लडाख भागात सीमावाद सुरू आहे. भारताच्या कणखर लष्करापुढे चीनचे इरादे यशस्वी होताना दिसत नाहीयेत. १८ नोव्हेंबर या दिवसाला लडाख संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्करी इतिहासात एक वेगळं स्थान आहे. याचं कारण शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल १९६२ साला. पूर्व लडाखपासून ते अरूणाचल प्रदेशापर्यंत वेगवेगळ्या आघाड्यांवर चीनने हल्लाबोल केला होता. यापैकी १८ नोव्हेंबरला चुशूल भागातल्या रेजांग ला या पोस्टच्या रक्षणासाठी झालेली लढाई ही भारतीय लष्करी जवानांच्या सामर्थ्याचं खरोखर मूर्तीमंत उदाहरण. या लढाईत मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या १२० जवानांनी पराक्रमाचं अत्युच्च उदाहरण जगासमोर ठेवलं.
'रेजांग ला'वर काय घडलं होतं?
रेजांग ला पोस्टवर १३ कुमाऊ या बटालियनची १२० जवानांची चार्ली कंपनी तैनात होती. या बटालियनचं नेतृत्व करत होते मेजर शैतान सिंह. अतिशय शूर, निधड्या छातीचा आणि कोणतंही आव्हान लिलया पेलणारे असे प्रचंड शक्तिशाली अधिकारी होते मेजर शैतान सिंह. १८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी रात्री तीन वाजता कडाक्याची थंडी, अंधार आणि बर्फवृष्टी सुरू असताना चिनी लष्कराने या पोस्टवर हल्ला केला. हा हल्ला साधा नव्हता. तब्बल २००० चिनी सैनिक अत्याधुनिक हत्यारांसह या पोस्टवर चालून आले. चिनी सैनिकांकडे स्वयंचलित बंदुका होत्या, एलएमजी होत्या. तर पोस्टवर असलेल्या अवघ्या १२० भारतीय सैनिकांकडे होत्या एकेक गोळी फायर करणाऱ्या जुनाट बंदुका... भारतीय चौकीवर रसद पुरवठा होऊ नये यासाठी चिनी तोफखाना रात्रीच्या अंधारात अक्षरशः आग ओकत होता. मात्र मोठ मोठ्या पहाडांमुळे भारतीय तोफखाना निष्प्रभ ठरत होता. अशातच हा हल्ला झाला... हेडक्वार्टरकडून मेजर शैतान सिंह यांना आदेश होता की चौकी सोडून मागे येण्याचा पर्याय खुला आहे. मात्र शैतान सिंह यांना माघार मान्य नव्हती. त्यांनी आपल्या जवानांचं मत जाणून घेतलं. १३ कुमाऊच्या जवानांनी एकमुखाने पोस्टवर टिकून राहण्याचा आणि पोस्ट लढवण्याचा निर्धार केला. मेजर शैतान सिंह यांनी आपल्या कंपनीला आदेश दिले की कोणत्याही परिस्थितीत एकही गोळी फुकट घालवू नका, प्रत्येक गोळीने एक चिनी सैनिकाचा मृत्यू झालाच पाहिजे. भीषण लढाईला तोंड फुटलं. तोफखान्याच्या माऱ्याच्या कवचाखाली चिनी सैन्य पुढे सरकत होतं. त्यांचा अंदाज होता भारतीय सैनिक पोस्ट सोडून मागे गेले असतील पण त्यांच्या वाटेत काळ बनून उभे होते मेजर शैतान सिंह आणि त्यांचे शूर १२० साथी... भारतीयांच्या प्रत्येक गोळीने चिनी सैनिक ठार मारायला सुरूवात केली... मात्र चिनी सैनिकांच्या लाटा थांबतच नव्हत्या... तब्बल ५ तास तुंबळ युद्ध झालं. दरम्यान मेजर शैतान सिंह यांनी आपल्या २२ वर्षांच्या युवा रेडिओ ऑपरेटरला मागे चुशूलला हेडक्वार्टरला मदतीची मागणी करण्यासाठी पाठवलं. मेजर शैतान सिंह यांनी पराक्रमाची शर्थ केली. आपल्या गोळ्या संपल्यावर भारतीय जवानांनी शत्रूच्या बंदुका खेचून त्याने शत्रूला कंठस्नान घालायला सुरूवात केली. चिनी सैनिकांच्या प्रेतांचा खच पडायला लागला. प्रत्येक भारतीय सैनिकाने रूद्राचा अवतार त्या रणभूमीवर धारण केला होता. गोळ्या संपल्या, दारूगोळा संपल्यावर भारतीय सैनिकांनी आणि शैतान सिंह यांनी चिनी सैनिकांशी अक्षरशः कुस्ती खेळून त्यांना उचलून आपटून मारायला सुरूवात केली. रक्ताचा अखेरचा थेंब शरीरात शिल्लक असेपर्यंत चीनला भारतीय भूमीवर पाऊलही ठेऊ देणार नाही असा निश्चयच भारतीय जवानांनी केला होता. सकाळी आठ वाजेपर्यंत तुंबळ युद्ध झालं. त्यात १२० पैकी ११४ भारतीय जवानांना हौतात्म्य आलं. ५ जवानांना चीनने युद्धबंदी म्हणून पकडलं. मेजर शैतान सिंह यांनी पराक्रमाची शर्थ करत या लढाईत वीरमरण पत्करलं. चीनच्या नोंदींनुसार त्या दिवशी चीनचे १८३६ सैनिक मारले गेले. ९० शवांवर चुशूलमध्ये सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या १२० भारतीय जवानांनी १८३६ चिनी सैनिकांना यमसदनी धाडलं यावरूनच भारतीय पराक्रमाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल.
या लढाईनंतर...
चिनी सैनिकांनी त्याच दिवशी सकाळी रेजांग ला वरून माघार घेतली. अपरिमीत हानी झालेल्या चिनी लष्कराने रेजांग ला या पोस्टचा आणि भारतीय लष्कराचा प्रचंड धसका घेतला होता. चुशूल वाचलं. तीन महिन्यांनंतर या पोस्टवर गेलेल्या भारताच्या दुसऱ्या तुकडीला आपल्या वीरांचे शव सुरक्षित सापडले. जीव गेला तरी सर्व वीरांची बोटं बंदुकीच्या ट्रिगरवरच होती. एका सैनिकाच्या हाती पिन काढलेला ग्रेनेड होता. शैतान सिंह यांचे शव खुद्द चिनी सैनिकांनी एका ब्लँकेटमध्ये लपेटलं होतं. त्यांच्या डोक्याशी बंदूक आणि त्यावर हेल्मेट होतं. परत जाणाऱ्या चिनी सैनिकांनी शैतान सिंह यांना सलामी दिली होती.
२०२० मध्ये...
आजही रेजांग ला ही पोस्ट भारताच्या ताब्यात आहे. मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या १२० शूरवीरांच्या हौतात्म्याने ही भूमी पावन झालीय. ही पोस्ट चीनला कधीही मिळाली नाही. शत्रूला एक इंचही आत येऊ न देण्याचा निश्चय मेजर शैतान सिंह आणि १३ कुमाऊच्या शूरविरांनी पूर्ण केला. आज सीमावाद सुरू असतानाही चिनी लष्कर सीमेपलीकडे दातओठ खात उभं आहे. मात्र त्यांच्यासमोर आज अतिशय उंचावलेल्या मनोबलाचे ताठ मानेचे कणखर असे भारतीय सैनिक उभे आहेत. शौर्यात ते मेजर शैतान सिंह यांच्या तुकडीचेच वारसदार. पण आजचा भारत बदलला आहे. आज भारतीय सैनिकांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत. जगात कोणत्याही लष्कराला नामोहरम करतील अशी सर्व साधनसामग्री भारताकडे आहे. त्यामुळे चीन इथे दुःसाहस करण्यास १० वेळा विचार करेल. स्वतःला महासत्ता समजणाऱ्या चीनचा हा मोठा पराभव समजला पाहीजे... चीनला आपण नमवू शकतो हा आत्मविश्वास, हे बळ भारतीय सैनिकांना दिलाय परमवीरचक्र विजेते मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या शूरवीर सैनिकांनी...