Sewer cleaning : गटार साफ करणारे कर्मचारी माणसं नाहीत का ?
Sewer cleaning :भारतात सरासरी दर पाच दिवसांनी एका गटार सफाई कामगाराचा मृत्यू होतो. तरीही आपण या याकडे दुर्लक्ष का करतोय ?
रिद्धी म्हात्रे / न्यूज अँकर आणि सहाय्यक निर्माती / मुंबई : Sewer cleaning :भारतात सरासरी दर पाच दिवसांनी एका गटार सफाई कामगाराचा मृत्यू होतो. न्यायालयाचे आदेश असूनही सफाईच्या कामात (cleaning) यांत्रिकीकरण किंवा ऑटोमेशन झालेले नाही. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. स्वतः घाणीत हात घालून जग स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामागरांच्या (Cleaning Sewers Staff) मृत्यूच्या घटनांनी मन हेलावतंय. पण तरीही आपण या याकडे दुर्लक्ष का करतोय ? आपण का तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अजूनही मागासलेले आहोत? इतक्या वर्षांपासून हा मुद्दा वारंवार उपस्थित होतोय मात्र परिस्थिती जैसे थे. आपल्या प्रत्येकासाठी स्वच्छतेचं हे काम निस्वार्थ भावनेने करताना रोज हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवाशी हा खेळ का होतोय, हा प्रश्न पडतो.
जगातील बहुतेक देशांमध्ये, गटार साफ करण्याचे काम आता पूर्णपणे यांत्रिक आणि स्वयंचलित झाले आहे. पण भारतात अजूनही ही गटारांची सफाई जुन्या पद्धतीनेच सुरू आहे. आपल्यापैकी अनेकजणांनी आपापल्या फेसबुक वॉलवर 2-4 वर्षांपूर्वी असा सफाई कामगारांचा गटार साफ करून बाहेर येतानाचा व्हिडिओ शेअर केला असणार. कामगारांचे हे असे फोटो किंवा व्हिडिओ पाहूनच आपण गुदमरतो. मग हे कामगार प्रत्यक्ष हे काम कसं करत असतील? मुळात सरकार या कामगारांची माणूस म्हणून होणारी ही कुचंबणा कधी थांबवणार?
योग्य आणि पुरेशी यंत्रसामग्री देशात आणली, तर यांचेही हाल संपतील ना. पण नाही. आपल्या देशातली सांडपाणी आणि सांडपाणी साफ करण्याची व्यवस्था अजूनही जुन्याच पद्धतीने सुरू आहे. न्यायालयाचे आदेश असूनही त्याचे यांत्रिकीकरण किंवा ऑटोमेशन झालेले नाही. राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत, राज्य आणि केंद्र सरकारे कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये, विशेषत: गटार साफसफाईमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मशीन्स आणण्यासाठी होणाऱ्या खर्चाकडे डोळेझाक करत आहेत हे उघड आहे. या कारणास्तव, आपण आजही हे प्राणघातक काम मानवाद्वारे करत आहोत.
जगात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारा आपला देश आणि त्यातील राज्य ही प्रगत आहेत मात्र तरीही नालेसफाईच्या बाबतीत इतके मागास का ? आता मलेशियातील सांडपाणी उद्योगच बघा! सतत संशोधन केल्यानंतर ती माणसं तिथे अनेक जुनी उपकरणे बदलत राहतात. तेथील सरकारने सांडपाणी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना अनुदान दिले आहे. ते नियमितपणे सर्वेक्षण करतात, लोकांना शिक्षित करतात आणि त्यांची सेप्टिक टाकी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी काय करावे हे देखील त्यांना सांगतात.
मलेशियामध्ये आता एकही स्वच्छता कर्मचारी सेप्टीक टँकमध्ये जात नाही. मशिननेही ती साफ होत नसेल तर ते नवीन सेप्टीक टाकी बनवतात. जपान आणि सिंगापूरमध्येही अशीच प्रक्रिया सुरू आहे.वर्षांपूर्वी झेन रोबोटिक्स नावाच्या स्टार्टअपने मॅनहोल्स साफ करण्यासाठी 40 किलो वजनाचा रोबोट बनवला, जो त्याच्या सफाईच्या कामाचा अंदाज 20 मिनिटांत देतो. दक्षिण भारतात याचा अधिक वापर केला जात आहे. परंतु, संरचित पद्धतीने नाही.
नालेसफाई संदर्भात कर्मचाऱ्यांच्या बाजूने आता सर्वसामान्यांनी ही आवाज उठवायला हवा. तरच गटारात कर्मचाऱ्यांचे होणारे मृत्यू थांबतील. नाहीतर तुंबलेल्या गटारातून घाणीत माखलेले कामगार बाहेर पडताना बघून आणि मृत्यूच्या बातम्या वाचून "आई ग, बिचारे!" असंच म्हणावं आणि नुसतं म्हणण्यावर समाधान मानावे लागेल.