शिलाजीत घेऊन, स्पारू-चिंगूच्या प्रेमात पडू नका !
हिमाचल प्रदेशात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बर्फ पडायला सुरूवात होईल. त्यामुळे पर्यटकांची पावलं सिमला, मनाली, कुलू, डलहौसी या थंड हवेच्या ठिकाणांकडे वळायला लागतील.
अमित भिडे, झी मीडिया, मनाली : हिमाचल प्रदेशात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बर्फ पडायला सुरूवात होईल. त्यामुळे पर्यटकांची पावलं सिमला, मनाली, कुलू, डलहौसी या थंड हवेच्या ठिकाणांकडे वळायला लागतील. बर्फाच्छादीत हिमशिखरंच नाही, तर अगदी रस्त्यांवर, दुकानांवर, घरांच्या कौलांवर जिथे तिथे बर्फाचंच साम्राज्य असेल. बर्फाळ वातावरणात मस्त उबदार शाल घेण्यासाठी, स्वेटरची खरेदी करण्यासाठी तुम्ही दुकानात शिराल आणि तिथेच तुम्हाला भुरळ घालेल स्पारू किंवा चिंगू... स्पारू आणि चिंगूच्या प्रेमात तुम्ही पडलात की संपलात... खिसा मोकळा होईलच पण नंतर महापश्चात्ताप करण्याची पाळी येईल.
ये चिंगू स्पारू क्या है !!
चिंगू, स्पारू हे कोणाचं नाव नाही तर हे आहे जम्मू काश्मीर राज्यातल्या लडाख प्रांतातल्या एका कथीत प्राण्याचं नाव. बकरीच्या जमातीतला हा प्राणी असतो असं सांगितलं जातं... या प्राण्याच्या लोकरीपासून तयार केलेलं ब्लॅंकेट म्हणजे स्पारू किंवा चिंगू... ही ब्लँकेट्स विकणाऱ्या दुकानांचं मोठं रॅकेट अगदी जम्मू काश्मीरपासून हिमाचल प्रदेश, पंजाब, नवी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत पसरलंय. मनालीत फिरण्यासाठी तुम्ही टॅक्सी केली असेल तर तुमचा ड्रायव्हर तुम्हाला एखाद्या एम्पोरियममध्ये इथे शाली चांगल्या मिळतात असं सांगून नक्की नेईल. तिथे गेल्यावर दुकानदार तुमचं आगत स्वागत करेल. तुम्हाला एखाद दुसरी शाल दाखवल्यावर लगेच पुढचे संवाद सुरू होतील...
दुकानदार- मनाली मे आए है तो यहा का कुछ यादगार लेके जाईये...
ग्राहक- हा शॉल तो देख रहे है ना भाईसाब
दुकानदार- इस से बढीया चीज आप देखीये...
असं सांगून मग तो तुमच्या समोर एक गुबगुबीत मऊशार मोहक रंगाचं ब्लॅकेट उलगडेल. लडाखमधल्या दुर्मिळ होत चाललेल्या चिंगू या प्राण्याच्या वूलपासून हे ब्लँकेट तयार झालंय अशी बतावणी तुम्हाला केली जाईल. या ब्लँकेटची किंमत तुम्ही विचाराल, पण पहिल्या फटक्यात तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं जाणार नाही. यासोबत तुम्हाला 5 गिफ्ट दिली जाणार आहेत असं सांगत गिफ्टही उलगडली जातील. गिफ्टमध्ये सशाच्या वूलपासून तयार केलेली शाल, बकरीच्या वूलपासून तयार केलेली शाल, एक गालिच्या आणि आणखी अशीच दोन गिफ्ट तुम्हाला दाखवली जातील. त्यानंतर मूळ चिंगू ब्लँकेट आणि ही पाच गिफ्ट मिळून तुम्हाला फक्त 10 हजार रूपये अदा करावे लागतील असं सांगितलं जाईल. ही किंमत क्वालिटीनुसार (खरं तर कस्टमर किती खर्च करू शकतो ते पाहून) 40 हजारांपर्यंतही वाढवली जाते. एवढंच नाही तर आत्ता टोकन पैसे भरा आणि उरलेले घरी गेल्यावर अदा करा असंही सांगितलं जातं. चिंगू ब्लँकेट आणि त्याच्यासोबतची सर्व गिफ्ट तुम्हाला घरपोच मिळतील असंही सांगितलं जाईल. आता 10 हजार रूपये किंमत ऐकून तुमच्या चेहऱ्याचा उतरलेला रंग त्यांच्या चटकन लक्षात येतो. त्यामुळे ते पुढे सांगतात...
दुकानदार- भाईसाहब ये आपको हमेशा के लिए ले जाना नही है
ग्राहक- तो ?
दुकानदार- पाच सालो बाद ये ब्लँकेट का इफेक्ट कम होता जाएगा... बाद मे आपको ये ब्लँकेट आपके शहर मे हमारे असोसिएट स्टोअर मे जाके जमा कराना है, जिसके बाद आपको 90 प्रतिशत पैसा वापस दिया जाएगा... ! याने के महज 1500 रूपये मे आपको पाच साल के लिए ये ब्लँकेट आणि हमेशा के लिए हमारे ये बाकी के गिफ्ट रखने है... !!!
ग्राहक- तो वापस लेके आप क्या करेंगे?
दुकानदार- इसे रिसायकल करके हम इससे पश्मिना शॉल बनाते है !
ही ऑफर ऐकून अनेक जण फसलेत. अनेकांनी चिंगू घेतली आहेत. अनेकांना घरी पार्सलच आली नाहीत, पाच वर्षांनंतर ही ब्लँकेट परत वगैरे काही होत नाहीत. तसे अनेक अभिप्राय इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मुळात हिमाचलप्रदेश सरकारने या ब्लँकेट विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही अक्षरशः प्रत्येक दुकानात ही विक्री अनधिकृतरित्या सुरू आहे. पण त्यावर कोणताही सरकारी अंकूश नाही.
हिमाचलच्या काही स्थानिकांशी चर्चा केल्यावर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले... त्यातला महत्त्वाचा म्हणजे चिंगू नावाचा प्राणीच अस्तित्वात नाही. त्यामुळे त्याचं वूलही असण्याचा संभव नाही. तुमच्या टॅक्सी ड्रायव्हरला चिंगूच्या ब्लँकेटबाबत विचारलं तर ते घ्या किंवा नका घेऊ असं काहीच सांगणार नाहीत, केवळ इट्स गुड एवढंच म्हणतील. काश्मिरी शाल व्यापाऱ्यांनी हा व्यवसाय इथे पसरवला आहे असं ब-याच स्थानिकांचं म्हणणं आहे. अनेकांनी सांगितलं की हे ब्लँकेट चांगलं आहे. पण त्याची किंमत 10 हजार नाही तर केवळ दोन ते अडीच हजार रूपये आहे. स्नॅप डीलवर हे ब्लँकेट विकायला आहे. पण त्याची किंमत केवळ अडीच हजार रूपये इतकीच आहे.
चिंगू किंवा स्पारूनंतर तुम्हाला पिडणारी गोष्ट असेल ती म्हणजे केशर आणि शीलाजीतवाले... मनालीच्या रस्त्या रस्त्यावर हे शीलाजीत विक्रेते तुम्हाला भेटतात... जडीबुटी ले लो, केशर ले लो, शीलाजीत ले लो असं सांगत तुम्ही मोहात पाडतात. केशरच्या सत्यतेचा पडताळा देत असल्याचीही बतावणी करतात... शीलाजीत खाल्ल्यामुळे म्हणे तुमचं आरोग्य पुढील 20 वर्षे उत्तम राहतं... पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा कोणत्याही जडीबुटी घेऊ नयेत असं तज्ज्ञ सांगतात.
हिमाचल प्रदेश ही खरं तर देवभूमी. तिथला अप्रतिम निसर्ग पाहिला तर तुम्हाला खरोखर हे बिरूद खरं असल्याची साक्ष पटते. त्यामुळे हिमाचलमध्ये जाणार असाल तर छान दऱ्या खोरी पाहा, बर्फाच्छादीत शिखरं पाहा, साचलेल्या बर्फात खेळा, स्कीईंग करा, पॅराग्लायडींग करून अक्षरशः धुंद होण्याचाही अनुभव घ्या. डोंगरदऱ्यात हिमालयाच्या कुशीत उगवलेली सुंदर रसाळ फळं खा. हिमाचलच्या देखण्या आणि तितक्याच उमद्या स्वभावाच्या नागरिकांशी खुप गप्पा मारा, पण हे चिंगू, स्पारू, शीलाजीत, केशर यांच्यापासून दोन हात दूरच राहा... असली वस्तूचा भाव कधीच कमी होत नाही हे तत्त्व नेहमी लक्षात ठेवा.