दीपक भातुसे, मुंबई : मागील चार वर्ष सत्तेत एकत्र बसूनही एकमेकांवर जहरी टीका करूनही भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांनी एका व्यासपीठावर येऊन युतीची घोषणा केली. युतीची घोषणा करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद कधी नव्हतेच अशा पद्धतीने या दोन्ही पक्षांचे नेते वागत होते. मात्र शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा होऊन केवळ दोन दिवस उलटले असताना युतीमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदावरून युतीमध्ये ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. त्यामुळे युती होऊनही शिवसेना भाजपामधील मतभेद आणि संघर्ष सुरूच असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपबरोबर युती झाल्याने नाराज झालेले अनेक शिवसैनिक मातोश्रीवर धडकले होते. उद्धव ठाकरे या शिवसैनिकांची समजूत काढत होते. शिवसैनिकांशी मातोश्रीच्या दारात उभं राहून संवाद साधताना युतीच्या चर्चेचा काही तपशील उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासमोर मांडले. "गेली 25 वर्ष ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मी यावेळी मान्य केलं नाही", असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे. "यावेळी मुख्यमंत्रीपदाचे आपले स्वप्न पूर्ण होईल", असंही उद्धव यांनी यावेळी जाहीर केलं आहे. जबाबदारीचे समसमान वाटप ठरल्याचे उद्धव ठाकरे यांनी युती झाल्यामुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांची समजूत काढताना सांगितलं आहे. उद्धव यांचा हा दावा खरा मानला तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आली तर अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे युतीच्या चर्चेत ठरल्याचे स्पष्ट होतंय. 


मात्र दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र उद्धव यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधी दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असेल. इतर जबाबदारी आणि पदांचे निवडून आलेल्या जागांच्या तुलनेत वाटप केलं जाईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 


युतीची घोषणा करताना लोकसभा आणि विधानसभेचं जागावाटप कसं असेल याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्यानुसार लोकसभेत भाजप २५ आणि शिवसेना २३ जागा लढवणार आहे. तर विधानसभेत मित्रपक्षांना देऊन उरलेल्या जागांचे समसमान वाटप केलं जाईल असं ठरलं आहे. त्याचबरोबर सत्ता आल्यानंतर अधिकार आणि जबाबदारीचे समसमान वाटप करण्याचं ठरलं असल्याचं या दोन्ही नेत्यांनी जाहीर केलं आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत युतीत काय चर्चा झाली, मुख्यमंत्रीपदाचे सूत्र काय असेल याबाबत या दोन्ही नेत्यांनी काहीही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यातून गोंधळच समोर येत होता. मात्र आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत परस्परविरोधी केलेल्या वक्तव्यांमुळे युतीतील गोंधळ आणि मतभेद दोन्ही समोर आले आहेत.


आता युतीची घोषणा होऊन ४८ तास उलटले नाहीत आणि मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षाचे नेते परस्परविरोधी दावे करत आहेत. युतीची घोषणा होऊन दोन दिवस उलटलेले नाहीत तोपर्यंत शिवसेना - भाजपमधील मतभेद समोर आले असून आता मुख्यमंत्रीपदावरून या दोन मित्रपक्षांमध्ये पुन्हा संघर्ष चिघळण्याची चिन्हं आहेत.