कृष्णात पाटील,झी मीडिया, मुंबई : पदांचे वाटप करायची वेळ येते तेव्हा शिवसेनेत नेहमीच मुंबई, कोकणला झुकतं माप दिलं जातं. राज्य असो किंवा केंद्र, मंत्रिपदाच्या अधिकतर माळा याच भागातील लोकप्रतिनिधींच्या गळ्यात पडतात. यामुळं राज्याच्या अन्य भागातील शिवसेना लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी निर्माण होण्याचे प्रमाण वाढलंय. भावना गवळींच्या नाराजीच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना सुरूवातीला मुंबई परिसर आणि कोकणात खऱ्या अर्थाने रुजली आणि वाढली. आता ती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली असून मुंबई आणि कोकणपेक्षा अधिक लोकप्रतिनिधी हे इतर भागातून निवडून येतात. परंतु मंत्रिपद असो किंवा इतर सत्तास्थाने वाटपाची वेळ येते तेव्हा मुंबई आणि कोकण भागातील लोकप्रतिनिधींना झुकतं माप दिलं जातं. हे केवळ आताच नाही तर पूर्वापार चालत आलेले आहे. फक्त अलिकडं हे ठळकपणे दिसून येतंय. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला आलेली पाचही कॅबिनेट मंत्रिपद ही मुंबई,कोकणातच दिली गेली. तर सात राज्यमंत्रीपदांपैकी २ मुंबई, कोकणात तर पाच राज्याच्या इतर भागात दिली गेली. मागील वेळचे केंद्रातील एकमेव मंत्रिपद हे कोकणात दिलं गेलं आणि आता ते मुंबईत ठेवलं गेलं. म्हाडा अध्यक्षपदही याच भागात दिलं गेलं. राज्यातील सर्वच जिल्हा संपर्कप्रमुखांसह तालुकासंपर्कप्रमुखही मुंबई, ठाण्यातीलच. म्हणजे राज्यभर शिवसैनिक राबणार, लोकप्रतिनिधीही राज्यभरातून निवडून येणार, पण पदांचे समान वाटप न करता मुंबई, कोकणला झुकते माप दिले जाणार...यामुळंच पाचव्यांदा खासदार झालेल्या भावना गवळी मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज आहेत. परंतु शिवसेनेला असं काही वाटत नाही. 



ग्रामीण भागाला मंत्रिपद द्यायला हवं होतं, पण अरविंद सावंत अनुभवी असल्यानं त्यांना मंत्रिपद दिल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांना खूप महत्व आहे. त्यामुळंच तर राज्य मंत्रिमंडळात थेट लोकांमधून निवडून न येणाऱ्या चार ज्येष्ठ नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिली गेली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र वारंवार निवडून येणा-या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना लोकांनीच घरी बसवलं आहे. त्यामुळं आता तरी ज्येष्ठांचे लाड पुरे, असं म्हणायची वेळ शिवसेनेत आली आहे. 


राज्याच्या ग्रामीण भागातील काँग्रेस,राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले शिवसेनेने नेस्तनाबूत केलेत. अशा ठिकाणी सत्तापदे देवून पक्ष मजबूत करण्याची गरज असताना सारी पदं मुंबईभोवतीच ठेवली जात असल्यानं ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढीला खतपाणी मिळतंय. ज्याचा फायदा इतर पक्ष उचलू शकतात.