लंका का होरपळतेय... श्रीलंकेत फिरताना काय दिसतं? थेट श्रीलंकेतून
मनात संताप असूनही लोकांची सहनशीलता, स्वच्छ आणि सुंदर रस्ते, समुद्रकिनारे
अमित भिडे, सीनियर प्रोड्युसर, झी २४ तास, कोलंबो : दक्षिण आशियातच नव्हे तर जगभरात श्रीलंका हा विषय सध्या हॉट टॉपिक झालाय. श्रीलंकेत जगभरातला मीडिया दाखल झालाय. अर्थात परिस्थितीही तशीच ओढवली होती. आरगलया नावाची चळवळ श्रीलंकेतल्या तरूणांनी सुरू केली. विद्यमान सरकारविरोधातला हा एल्गार आहे.
कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांना इथे राज्य करू देणार नाही या प्रमुख मागणीसह सहा मागण्या आंदोलकांनी ठेवल्या. 9 जुलैला या सगळ्याचा कळस झाला आणि आंदोलकांनी अध्यक्ष, पंतप्रधानांच्या घरावर हल्लाबोल केला. लोक त्यांच्या घरात त्यांच्या बेडरूममध्ये स्विमिंग टँकवर कसे पोहोचले हे आपण टीव्हीवर पाहिलं आहेच.
एलटीटीई समूळ नष्ट करून श्रीलंकेत कित्येक दशकांचं यादवी युद्ध संपवणारा राजपक्षे परिवार हा खरंतर श्रीलंकेत एकेकाळी हिरो होता. महिंदा राजपक्षे हे तेव्हा अध्यक्ष होते आणि त्यांचा भाऊ गोटाबाया हा तेव्हा डिफेन्स सेक्रेटरी होता. 2005 पासून राजपक्षे कुटुंबाची निरंकुष सत्ता श्रीलंकेवर आहे, अपवाद 2015 च्या अध्यक्षीय निवडणुकीचा.
श्रीलंकेत फिरताना काय दिसतं?
श्रीलंकेत रस्त्यावर फिरताना काय दिसतं याची दोन उत्तरं माझ्याकडे आहेत. परदेशी पत्रकार या नजरेने श्रीलंकेत बातमीदारी करताना मी एक सामान्य भारतीय म्हणूनही फिरतोय. पत्रकार म्हणून काय दिसलं ते आधी सांगतो कारण त्याच भूमिकेत मी प्रथम आहे. श्रीलंकेत कमालीचे हाल होत आहेत. श्रीलंका रसातळाला गेली आहे. इथे लोक भुकेले आहेत, एकवेळचं जेवणही कसंबसं मिळतंय.
पेट्रोलच्या रांगेत लोक सहा सहा दिवस राहात आहेत. विचार करा एक रिक्षावाला ज्याच्या उपजीविकेचं साधन ही त्याची रिक्षा आहे. ती रिक्षा पंपावर उभी करून तिथेच फुटपाथवर तो 6 दिवस राहात असेल तर तो रिक्षा फिरवणार कधी, कुटुंबाला पोसणार कसा आणि स्वतः खाणार काय. मग अशा परिस्थितीत त्याने गोटाबायाला शिव्या घातल्या तर बिघडलं कुठे.
इथे मध्यमवर्गातल्या काही महिलांवरही वेश्या व्यवसाय करायची वेळ आलीय. मग त्या महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबाने गोटाबायाच्या नावाने बोटं मोडली तर काय चुकलं? इथे शाळा कॉलेजं बंद आहेत, मुलांच्या पालकांनी गोटाबायाला शिव्याशाप दिले तर बिघडलं कुठे? पोटातली भुकेची आग, रोज कामासाठी वाहनाअभावी 10 - 20 किलोमीटर चालल्यावर लोक सरकारला सवाल करणारच त्यात त्यांचं काहीच चुकलं नाही.
रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता. तसंच कोलंबो होरपळत असताना सगळे राजपक्षे मजेत होते मग ती होरपळ, ती धग त्यांना सोसावी लागणारच. इथे मी आंदोलनाच्या बाजूने लिहितोय असा आक्षेप माझ्यावर नक्की घेतला जाईल. पण पत्रकाराने सरकारला प्रश्न विचारावे, लोकांसाठी पत्रकारिता करावी असं मला भारतात शिकवलं गेलंय. तर त्या भूमिकेतून मी पत्रकार म्हणून 100 टक्के बरोबरच ठरतो.
इथे बातम्या गोळा करण्यासाठी मी आणि कॅमेरामन पंकज मनराल कॅमेरा, ट्रायपॉड, खांद्यावरची बॅग, डोक्यातले बातमीचे विचार एवढं ओझं घेऊन रोज 25 ते 30 किलोमीटर पायी फिरतोय. उन्हातून तळपत पायाचे तुकडे पडत फिरताना पत्रकार म्हणून बातम्या गोळा करताना मी हादरून गेलो नाही तर नवल ते काय? जवळपास 4 दिवसांनी आज आम्हाला टॅक्सी मिळाली. त्या टॅक्सीत बसल्यावर काय वाटलं मी शब्दात लिहू शकत नाही. ही आत्मप्रौढी वगैरे नक्की वाटेल पण मी हा लेखच अनुभव लिहिण्यासाठी लिहिलाय हे लक्षात घ्या. श्रीलंका उभी करण्यासाठी आणखी 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे किती लागतील माहिती नाही.
माझ्या एका वरिष्ठ पत्रकार मित्राने मला प्रश्न विचारला की श्रीलंकेचा अफगाणिस्तान झालाय का? या प्रश्नाचं उत्तर मला पत्रकार म्हणून देण्याऐवजी सर्वसामान्य भारतीय म्हणून द्यावं असं वाटतं.
भारतीय म्हणून श्रीलंकेत काय दिसलं?
विमानतळावर पहाटे पाच वाजता उतरलो तेव्हा वाटलं होतं बाहेर काय तांडव सुरू आहे देव जाणे. सगळे सोपस्कार करून बाहेर आलो तर बाहेर रिक्षा टँक्सींची टंचाई होती. एक टॅक्सीवाला कसाबसा तयार झाला. त्याने तब्बल 11 हजार रूपये घेतले. टॅक्सी रस्त्याला लागली. सुनसान पण स्वच्छ रस्ते, मोठा हायवे, जागोजागी व्यवस्थित मार्किंग, स्पीड लिमिट पाळणारे लोक असं बरंच काय काय दिसलं.
कोलंबो जवळ येतं तसा कोलंबोत उभा होत असलेला लोटस टॉवर लक्ष वेधून घेतो. चिनी वर्चस्वाच्या खाणाखुणा दिसायला लागतात. श्रीलंकेत लोक अतिशय साधे आहेत. त्यांनी उभारलेल्या आरगलय चळवळीतही एक डिसेन्सी दिसते. पिपल्स रॅली फॉर स्ट्रगल असं सिंहली, तामिळ, इंग्रजी भाषेत लिहिलेलं दिसू लागतं. वाटेत जागोजागी गो गोटा, गो रनिल असे हॅशटॅग भिंतीवर लिहिलेले.
पण सचिवालयाबाहेर लोक शांततेत बसलेले. एक कुटुंब या आंदोलनात सहभागी झालंय पाणी घेऊन. रोज पाण्याच्या बाटल्या वाटतात. एक कुटुंब रोज परिसरातला कचरा वेचून एकत्र जमा करतंय. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ते हे करत असल्याचं त्यांनी सांगितलं. एक भारतीय म्हणून मला इथे दिसते स्वच्छता आणि मनात संताप असूनही लोकांची सहनशीलता. लोक अर्धपोटी आहेत पण वखवखलेले नाहीत. एकाही पत्रकाराचं पाकीट, मोबाईल मारल्याचं उदाहरण नाही.
रिक्षा, टॅक्सी महाग चालवली जात आहे, वादच नाही पण 6 दिवस रांगेत उभं राहिल्यावर कोणत्याही देशात असेच रेट वाढणार. रस्त्यावर कोणी पचापचा थुंकत बसत नाहीत. आंदोलनाच्या ठिकाणी कोणी हागून, मुतून ठेवलेलं नाही. गाले भागातला समुद्र किनारा कमालीचा स्वच्छ. निळाशार समुद्र, किनाऱ्यावर कचऱ्याचा 'क' नाही. समुद्राला घाणेरडा वास नाही. रस्ता क्रॉस करताना आधी लोकांना प्राधान्य. कालच चालताना आम्ही आपले रेंगाळत रस्त्याच्या बरेचसे मधून चालत होतो. मागून एक मोठी टोयोटावाला येऊन थांबला होता. दोन मिनिटांनी आमच्या लक्षात आलं तो आमच्यासाठी थांबला होता. आम्ही रस्ता ओलांडल्यावर तो पुढे गेला.
खिडक्या उघडून 'तुझ्या मायला' वगैरे काही नाही. हे गाले भागातच दिसतं का? नाही... आम्ही कोलंबोच्या इंटेरियरमध्येही गेलो. रिक्षाने अगदी केलानीयापर्यंत गेलो. खेडी टुमदार, घाणेरडेपणा नाही. वाटेत केलानी गंगा नावाची नदी लागली. मस्त पात्र, नदीत पाण वनस्पती वगैरे नाहीत. छान नितळ पाणी होतं. श्रीलंका भारतापेक्षा खूपच स्वच्छ आहे. इथे रस्त्यावर खड्डे नाहीत. मी कल्याण डोंबिवली भागात राहतो. त्यामुळे खड्डे आणि त्यांचं आयुष्यातलं महत्त्व हे मला बालपणापासून माहितीय.
आता मुंबईच्या पेडररोड वगैरे भागाला कोणी स्वच्छ म्हणून मुंबईची महती सांगणार असतील ती मला मान्य नाही. रस्ते, कम्युनिकेशन याबाबतीत श्रीलंका भारताच्या पुढे आहे यात शंकाच नाही. आरगलया चळवळीला सर्वत्र पाठिंबा आहे. सरकार लोकांनीच उलथवलंय. पण म्हणून सर्वसामान्य श्रीलंकन माणसाने श्रीलंकेचा अफगाणिस्तान नक्की केलेला नाही. पाश्चात्य वृत्तवाहिन्या तसं चित्र रंगवत असतीलही पण ते चित्र चुकीचं आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो.
श्रीलंका खूप छान देश आहे. या देशात भारतीयांनी यायलाच हवं. आज ना उद्या श्रीलंका संकटातून उभा राहील. मग पुन्हा एकदा या पाचूच्या बेटावर शांतता नांदेल, समृद्धी येईल. गतवैभव श्रीलंकन माणसाच्या मनात आहेच, तो ते परत मिळवेल यात शंकाच नाही