प्रशांत अऩासपुरे, झी मीडिया, मुंबई : अमेरिकेतल्या वर्ल्ड ऑफ डान्स या रिएलिटी डान्सिंग शोचे विजेते ठरलेले विजयी शिलेदार अगदी सर्वसामान्य  कुटुंबातून आलेले आहेत...मुंबईत घर घ्यायचं त्यांचं स्वप्न आहे...पाहूयात, नालासोपाऱ्याच्या गल्लीबोळात राहणाऱ्या या स्ट्रीट डान्सर्सनी तरुणाईला करिअरचं एक नवं क्षेत्र खुलं करून दिलं आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यारस्त्यांवर डान्स करणारे स्ट्रीट डान्सर्स म्हटलं की ते टपोरी, टारगट करिअरबाबत फारसं गांभीर्य नसणारेच तरुण असतात, असा आजही अनेकांचा गैरसमज आहे.  मात्र हाच गैरसमज खोटा ठरवलाय नालासोपाऱ्यातल्या हा तरुणांनी.  द किंग्ज युनायटेड या ग्रुपचे हे शिलेदार ज्यांनी राष्ट्रीय नव्हे तर थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवलीये. पॅशन एकच डान्स...डान्स आणि डान्स...



मुंबापुरीत सुपरस्टार होण्याची स्वप्न पाहणारे गली बॉय काही कमी नाहीत. नालासोपाऱ्यातील अशाच एका डान्स ग्रुपने थेट अमेरिकेत विजेतेपदाचा झेंडा फडकवलाय.


नालासोपाऱ्यातील द किंग्ज या डान्स ग्रुपने अमेरिकेतील वर्ल्ड ऑफ डान्स या रिएलिटी शोमध्ये विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. १४ जणांच्या या ग्रुपमध्ये कोरिओग्राफर सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्यातील १७ ते २१ वर्षे वयोगटातल्या या तरुणांनी हे स्वप्न सत्यात उतरवलंय.  विजेतेपदाच्या ट्रॉफीसह या ग्रुपला तब्बल सात कोटी रुपयांचं बक्षीसही मिळालंय. २६ फेब्रुवारीला  सुरू झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच अमेरिकेत पार पडली. अमेरिकेतील डान्स स्पर्धेत नालासोपाऱ्यातील द किंग्ज युनायटे़ड ग्रुपने विजेतेपद मिळवलं खऱं, मात्र अंतिम फेरीपर्यंतचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. जीवतोड मेहनत करत या भारतीय तरुणांनी बाजी मारली असली तरी अंतिम फेरीत कॅनडा, फिलिपाईन्स, दक्षिण कॅलिफोर्निया यांसारख्या देशातील डान्स ग्रुपशी तगडी स्पर्धा होती. मात्र भारताचं नाव जागतिक पातळीवर पोचविणाऱ्या या नालासोपारा द किंग्जनी आंतरराष्ट्रीय परीक्षकांकडून तब्बल शंभर पैकी शंभर गुण मिळवत धमाकेदार परफॉर्मन्स आणि जीवतोड मेहनतीबद्दल खास दाद मिळवली आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं..स्वप्न पाहून ती सत्यात उतरविणाऱ्या नालासोपाऱ्यातल्या या द किंग्जमुळे भारतीयांची मान तर उंचावली आहेच.


त्याचबरोबर अशी स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईचा उत्साहदेखील नक्कीच वाढण्यास मदत होईल....ऋतिक गुप्ता, या विजेत्या टीममधील स्पर्धकाची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. आपल्याकडे साधारणतः आधी शिक्षण आणि मग एखादा आवडता छंद जोपासा हा रिवाज आजही अऩेक घरांमध्ये पहायला मिळतो. ऋतिक म्हणतो, आई म्हणायची आधी शिक्षण पूर्ण कर मग डान्स..तर शिजीत गुप्ताच्या घरच्यांनाही स्ट्रीट डान्सर्स हे करिअर होऊ शकत यावर अजिबातच विश्वास नव्हता. त्यामुळे शिक्षणानंतर शिजीतला आधी नोकरी धरावी लागली. नोकरी आणि डान्सची आवड असा समतोल साधताना त्याची तारेवरची कसरत सुरू होती. मात्र कालांतराने डान्स हेच आपलं करिअर आणि जीवन आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधत शिजीतने नोकरीकडे पाठ फिरवली आणि पूर्णपणे स्वतःला डान्सिंगमध्ये झोकून दिलं. भारतातील काही रिएलिटी शोंमधून सहभागही नोंदवला. मात्र पैसे आणि यश म्हणावं तसं मिळत नव्हतं. स्ट्रीट डान्सर्स म्हणून मान आणि प्रतिष्ठा तर फार काही नव्हतीच. आता अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड ऑफ डान्स स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या या तरुणांचं विश्वच आता बदलून गेलंय. तब्बल १ मिलियन डॉलर्स एवढं मोठ्ठं बक्षीसही या टीमला मिळालंय. खरंतर वसई-विरार-नालासोपारा परिसरातील मध्यमवर्गीय सर्वसामान्य घरातील ही मुलं. १४ जणांच्या या ग्रुपमध्ये कुणाचे वडील वॉचमनची नोकरी करतात, तर कुणी स्वतःच छोटीमोठी नोकरी पत्करून घरचा आर्थिक भार सांभाळायची कसरत करतात. कोरिओग्राफर सुरेश मुकुंद याच्या नेतृत्वाखाली १४ जणांच्या या टीमचं बॉण्डिंग असं काही जमलं की स्टेजवर परफॉर्मन्स करताना एकमेकांची साथ पाहून प्रत्येकजण अक्षरशा भारावून जातो. यातील अनेकांना स्वतःच घर नाही. यातल्या अनेकांना स्वतःचं घर नाही. घराचं स्वप्न पुर्ण करणार असल्याचं सुरेशने म्हटलंय. एकुणच स्ट्रीट डान्सर्स या दुर्लक्षित राहिलेल्या क्षेत्राला या तरुणांच्या जिद्दीमुळे भारतात एक वेगळं वलय प्राप्त होईल यात शंकाच नाही. तरुणाईसाठी एका नव्या करिअरची ही नांदी ठरेल अशी आशा करुयात...