सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : तुमच्या घरात बाजूला पडलेली मी एक आता समृद्ध अडगळ आहे. पण कधीकाळी तुमचं 'स्टेटस' होती. आज जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने आठवणी मनात घर करतायत. कारण दिवस माझेही सोन्याचे होते, आणि तुमचेही अगदी सायकल शिकण्याचे.... म्हणजे झोपाळ्यावाचून झुलायचेच की. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबांकडे सतत तगादा लावल्यानंतर, मी पहिल्यांदा तुमच्या दारी आले, तेव्हा माझं हळदीकूंकवाने औक्षण करून स्वागत झालं. घरातील सर्वांकडून माझी काळजी घेतली जात होती. माझ्या घंटीचा आवाज आला, तरी सर्वांची नजर दाराकडे जात होती. माझ्यासाठी सावली शोधली जायची, कुणी मला पळवून नेऊ नये, म्हणून मला लावलेलं कुलूप घरातील लहान मंडळी २-२ वेळेस तपासायची. 


जेव्हा घरातील बच्चे कंपनी कापडाच्या फडक्याने मला पुसून काढायचे, तेव्हा एखाद्या सौंदर्यवतीच्या चेहऱ्यावर मेकअप करताना पफ फिरतोय असं मला वाटायचं. तुमच्यासाठी हे काहीच्या काही असेल, पण ही माझ्यासाठी सर्वात छान आणि मानाची वागणूक होती.


घरातील ज्याच्याकडे माझी चावी, तो त्या घडीभरचा राजाच असायचा जणू. सर्वांना सायकल चालवायला शिकायचं होतं. म्हणून तुमच्यासोबत मलाही अनेकदा धडपडावं लागलं. 


तुम्हाला सायकल शिकताना अनेकदा पायाला रक्तही आलं. नवीन पहेलवाल फुफाटामाथी लावून डाव शिकतो, तसं फुफाट्यात रस्तावर पडत झडत तुम्ही सायकल चालवण्याचे डाव शिकलात.


तुम्हाला अनेक वेळा छोटीशी जखमही झाली, अशावेळी नवशिक्या लहानग्यांची मला काळजी वाटायची. तेवढीच काळजी तुम्हाला मी आजारी पडल्यावर व्हायची, पण पंक्चर नावाचा ताप काही मिनिटात दूर होत होता. तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर क्षणात हास्य खुलायचं...


माझ्यावर त्या काळात प्रत्येकाने हक्क गाजवला. अगदी वजन वाहून नेण्यासाठी, ते पटकन ऑफिस गाठणारे, पोस्टमन काकांनाही माझी मदत व्हायची, अगदी खेडोपाडी कान्याकोपऱ्यात सुख दु:खाचं पत्र माझ्या मदतीने पोहोचायचं हे आवर्जून आणि हक्काने सांगतेय.


तुम्ही मुशाफिरी करायला निघायचे, तेव्हा गळ्यात रेडिओ, त्या गाण्यांची साथ आणि पायडल मारण्याची ती लय...आणि रस्त्याकडे नाही, तर प्रेमाचा शोध घेणारी तुमची ती नजर...वाह... किती सांगावं त्या दिवसांबद्दल...


पण आज...सर्वांना अधिक वेग हवा आहे, आरामदायक गोष्टींकडे जात असताना माझी जागा मोटारसायकलीने घेतलीय...पण आजही मी आहे, तशीच आहे...फक्त अधिक वेगाच्या काळाच्या मागणीत मी मागे पडलेय...पण अजूनही सायकल चालवणाऱ्यांसाठी आरोग्याच्या शिदोरीची जागा सांभाळून आहे...