मुंबई : पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (Pandurang Shastri Athavale) अर्थात दादाजी यांचा वाढदिवस (१९ ऑक्टोबर) स्वाध्याय परिवार (Swadhyay Pariwar) 'मनुष्य गौरव दिन' (Manushya Gaurav Din) म्हणून साजरा करत असतो. कोरोनामुळे 2 वर्ष दादांचा वाढदिवस स्वाध्यायीना एकत्र मिळून साजरा करता आला नाही. पण या वर्षी पुन्हा एकदा १६ राज्यांतील दीड लाख स्वाध्यायी दादाजींचे विचार घेऊन भक्तीफेरीसाठी बाहेर पडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादाजींचे विचार घेऊन हे स्वाध्यायी निरपेक्षपणे लोकांना भेटत आहेत. १३ ते १८ ऑक्टोबर हे ६ दिवस स्वखर्चाने आपली भाकरी घेऊन हे स्वाध्यायी आगळी वेगळी भक्तीफेरी (Bhakti feri) करत असतात. कारण दादाजींनी कृतिभक्तीचा केवळ विचार न देता त्या मार्गावर चालणारे लाखो स्वाध्यायी उभे केले.


आधुनिक युगातील महापुरुष पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी संपूर्ण आयुष्य मनुष्यातील गौरव (Manusya Gaurav) उभं करण्याचं काम केलं. त्यांच्या या कामाची जगभरात नोंद घेण्यात आली. विदेशातील अनेक ऑफर्स नाकारून त्यांनी भारतातूनच आपल्या या कार्याची सुरवात केली आणि आज हे कार्य जगभरातील 22 हुन अधिक देशांमध्ये सुरू आहे.


सत्ता आणि पैसा असलेल्या लोकांनाच मान सन्मान मिळत आहे. याचा अर्थ इतरांना किंमत नाही का? त्यांना कोणीही कधीही विकत घेऊ शकतं का? अशी परिस्थिती आजच्या समाजावर का आली ? याचं उत्तर दादाजींनी शोधलं आणि स्वाध्याय कार्यातून मनुष्याचा गौरव उभा केला. कर्मकांडात अडकलेल्या मनुष्याला त्यांनी आधुनिक भक्तीचा मार्ग समजावत इतरांच्या प्रति भाव उभा केला आणि यातून आज मनुष्याचा गौरव साजरा करणारा लाखोंचा स्वाध्याय परिवार तयार झाला. एकीकडे समाजात उच्च-नीचता वाढत असताना, दुसरीकडे समोरचा हा माझा दैवी भाऊ / बहीण आहे. त्याच्यासोबत माझा दैवी संबंध आहे. असा मानणारा स्वाध्याय परिवार आहे.


वयाची 83 वर्ष दादांनी विविध प्रयोगातून मनुष्यातील गौरव समजावला. भोगवादी समाजात भाववादी विचार उभा केला. युवा शक्तीला योग्य मार्ग दाखवत त्यांना जीवनाचा खरा अर्थ सांगितला. त्यांच्या या कार्याची दखल घेत इतर देशांनी देखील दादाजींचा विविध पुरस्कारांनी गौरव केला. आज हा स्वाध्याय परिवार दादाजी यांची कन्या धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने लाखोंचा हा परिवार आज आधुनिक युगातील संत पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांना वंदन करत आहे.