सुरेश देवकर, स्वयंसेवक, जिजाऊ प्रतिष्ठान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित NAB (National Association for the Blind, India) च्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसोबत तोरणा किल्याच्या भटकंतीला जाण्याची संधी मिळाली. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, ह्या भावनेनं जिजाऊ प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री. चंद्रकांत साटम साहेब गेली आठ वर्षे अविरत ही मोहीम राबवित आहेत. या वर्षी त्यांच्यासोबत स्वयंसेवक म्हणून जाण्याचा योग आला.


तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा १४०३ मीटर (४६०४ फूट) उंचीचा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० किमी आहे.


शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४५ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले असे म्हणतात, खरंतर गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.



NAB चे साधारण १० ते २० या वयोगटामधील ४० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत त्यांचे शिक्षकगण व आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक असे ४५ स्वयंसेवक शुक्रवारी रात्री मुंबईहून निघालो. मोटरमनच्या अचानक संपावर जाण्याने २ तास उशीर झाला होता. आजपर्यंत अनेक ट्रेक केले आहेत, परंतु अंध मुलांना जबाबदारीने किल्यावर घेऊन जाणे, जे आपण पाहतो ते त्यांना समजावून सांगणे, आपला अनुभव सांगणे, ज्ञात असलेला इतिहास सांगणे आणि सुरक्षितपणे सर्वांना खाली आणणे हे सर्व प्रथमच अनुभवणार होतो. दोन दिवस विद्यार्थ्यांचे अथपासून इतिपर्यंत सर्व काही करायचं होतं. त्या अनुषंगाने मनाची तयारी होतीच व हे सर्व अनुभवण्यासाठी उत्कंठाही शिगेला पोहोचली होती.


शनिवारी सकाळी साधारण ८:०० वाजता आम्ही वेल्ह्यात पोहोचलो. पुण्याहून विवेक देशपांडे व कल्याणहून विलास वैद्य हे आमचे डोंगरबंधु अगोदरच आपापल्या वाहनाने त्यांच्या मित्रांसोबत पोहोचले होते. स्वयंसेवकांनी एक एका विद्यार्थांची जबाबदारी घेतली. माझ्यासोबत पियुष राठोड हा दहावीचा विद्यार्थी होता. चहा, नाश्ता वगैरे उरकून झाल्यानंतर साटम सरांनी सर्वांना किल्याचा इतिहास उलगडून सांगीतला व ९:३० वाजता ट्रेक सुरू केला. साटम सरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असते.


मुलांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. त्यांच स्वतःचं एक विश्व आहे, त्यात सर्व रमलेले असतात, त्यातून बाहेर पडून सरांनी सांगितलेला इतिहास ऐकून ते सर्व अनुभवायला मिळणार हे त्यांचे निरागस चेहेरे बघून स्पष्ट जाणवत होतं. आमच्या भटकंतीची आणि पावसाची सुरुवात एकत्रच झाली. आम्ही महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने बिनी च्या दरवाजातून तोरण्यावर जाणार आहोत. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते.



पहिला टापू चढू लागल्यानंतर छोटी मुलं स्वयंसेवकांना सारखी गोड विनंती करायची की, दादा, चिखलातून नको ना घेऊन जाऊ!!. टापू चढून जेव्हा सोंडेवर आलो तेंव्हा रिमझीम पाऊस आणि गुंजवणी धरणाकडुन खालून येणार सोसाट्याचा वारा यामुळे मुलांचा उत्साह आणिकच वाढला... काहींनी तर मला हवेत उडायचय म्हणून त्याप्रमाणे हातवारे करायला सुरुवात केली!!!! शारीरिक कमतरतेची जराही उणीव न ठेवता त्यांचे ते क्षण अनुभवणे....अनंत अडचणींना तोंड देत त्यांचं जगणं.... त्यांच भावविश्व....सर्वच अंतर्मुख करणारं....माझ्या मनात विचारांची घालमेल काही थांबत नव्हती!!


टापू चढून आल्यावर सर्वांनी अगोदरच दिलेला खाऊ खाऊन पोटपूजा केली, बाकीचे येईपर्यंत गप्पा, सेल्फी, वगैरे..वगैरे...पुन्हा सर्व नव्या जोशाने चालू लागले, आता दगडांवरून खडी चढाई होत होती. आम्ही स्वयंसेवक सर्वांची पुरेपूर काळजी घेत मार्गक्रमण करत होतो. पाऊस सतत कोसळत होता आणि धुक्याने दऱ्या व्यापून टाकल्या होत्या. गणेश आणि विलास यांनी पुढे जाऊन एका उभ्या रॉकपॅच वर रोप लावून ठेवली होती त्याच्या साह्याने आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या वर घेऊन गेलो. पुढे अंतिम टप्प्यात, शासनाने लावलेल्या रेलिंग मुळे मुलांची बिनीच्या दरवाजापर्यंतची चढण सोपी झाली. साटम सरांनी बिनीच्या दरवाजात पुन्हा एकदा इतिहास जागवला.


आम्ही दुपारी ३ वाजता किल्यावर पोहोचलो, मागोमाग गावातून जेवण घेऊन ग्रामस्थ हजर झाले होते. पावसाचा जोर आणिकच वाढत होता, हवेत खूपच गारवा होता, संपूर्ण किल्याने दाट धुक्याची शाल पांघरली होती मुलंही थोडी दमली होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वाटाही निसरड्या झाल्यामुळे मुलांचं गडदर्शन अपूर्ण राहिले. रात्री वरांड्यात झोपलेल्या आम्हा चौघांनी निसर्गाच्या रौद्रपणाची एक झलक अनुभवली.



दुसऱ्या दिवशी सकाळची सर्व आन्हिके उरकून परतीच्या वाटेला लागलो. तत्पूर्वी किल्यावर सर्व मुलासोबत त्यांचे निरागस भाव आणि उत्साह कॅमेऱ्यात टिपला. विवेक देशपांडे यांनी पुण्याच्या गिरिप्रेमी संस्थेच्या सदस्यांना अगोदरच सांगून ठेवल्याने, त्यांनी रात्रीच मुक्कामी येऊन, सकाळी मुलांसाठी त्या अवघड कातळावरून उतरणासाठी रोप फिक्स करून सर्व टेक्निकल साहित्याची तयारी करून ठेवली होती. सुरक्षितरीत्या मुलांना खाली उतरवून निसरड्या वाटेवरून तोल सावरत खाली आलो. 


खाली येताना एका निसरड्या वाटेवर माझ्यासोबत असणारा पियुष राठोड मला म्हणाला, "दादा, मी पडलो तरी तुम्हाला पडू देणार नाही"....काही क्षण मी स्तब्धच झालो, मनात विचार आला, कोण कोणाला सावरतय!! त्याच्यासोबत अनेक विषयांवर बोलतांना सारखं जाणवत होतं विचारांची केवढी प्रगल्भता, केवढाआत्मविश्वास, केवढा समजूतदारपणा आहे ह्या सर्वांकडे..... सारं काही वारंवार विचार करायला लावणारं!! 


दोन दिवसात या मुलांकडून खूप काही शिकायला मिळालं. देवानं जरी दृष्टीचे दान त्यांच्या झोळीत नाही टाकलं, तरी जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अचंबित करून टाकणारा आहे. 


मथळ्यामध्ये जे प्रश्नचिन्ह आहे, ते जाणीवपूर्वक दिले आहे, कारण संपूर्ण भटकंतीदरम्यान आम्हाला कुठेही त्यांची दृष्टीहीनता जाणवली नाही, किंबहुना डोळस माणसांपेक्षा त्या पलीकडे पाहण्याचा देवाने त्यांना आशीर्वाद दिला आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत.


(नोट : या ब्लॉग लेखनाची संपूर्ण जबाबदारी लेखकाची असेल)