अमित भिडे, सीनियर प्रोड्युसर, झी २४ तास, कोलंबो : अराजकाच्या स्थितीतून आता श्रीलंकेला सावरण्यासाठी २० जुलैला नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. कोण होईल श्रीलंकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष...येणारे राष्ट्राध्यक्ष श्रीलंकेला गर्तेतून कसे सावरणार पाहूया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचे नवे अध्यक्ष कोण होणार? श्रीलंकेचं राजकारण कोणतं नवं वळण घेणार? श्रीलंकेला आर्थिक संकटातून सावरणारा मसिहा कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं २० जुलैला मिळणार आहेत.


महागाई, बेकारी, अन्नटंचाईला कंटाळलेल्या श्रीलंकन नागरिकांना बंड करून थेट राष्ट्राध्यक्षांना देशाबाहेर हाकलून दिलं. आता नवे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. चार बड्या नेत्यांनी आपापली उमेदवारी जाहीर केलीय. १९ तारखेला हंगामी अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे, विरोधी पक्षनेते सजित प्रेमदासा, मार्किस्ट नेता अनुरा कुमारा दिसनायके आणि एसपीपीतून फुटून निघालेले डलास अलाहापेरूमा हे चौघे या शर्यतीत आहेत.


रनिल विक्रमसिंघे हे या शर्यतीत सर्वात बलशाली नाव समजलं जातंय. कारण विक्रमसिंघे यांना सत्ताधारी एसएलपीपी पार्टीने तातडीने पाठिंबा जाहीर केलाय. सजित प्रेमदासा हे आणखी एक मोठं नाव. श्रीलंकेत प्रेमदासा यांची ब-यापैकी ओळख आहे. त्यामुळे ते ही या शर्यतीत आहेत. मार्क्सवादी नेते दिसनायके यांच्या उमेदवारीमुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. जनतेच्या उठावामुळे दिसनायके यांना जनतेची सहानुभूती मिळेल पण जनता या निवडणुकीत मतदान करणार नाहीये. तर अलाहापेरूमा हे या शर्यतीत डार्कहॉर्स होऊ शकतात. एसएलपीपीतला एक गट अलाहापेरूमांच्या पाठिशी उभा राहू शकतो. मात्र तसं झालं तर विक्रमसिंघे यांना मतफुटीचा फटका बसेल आणि त्याचा लाभ प्रेमदासांना होऊ शकतो.


श्रीलंकन संसदेत २२५ खासदार आहेत. खरं तर अध्यक्षांची निवड श्रीलंकेत थेट जनतेतून होते. पण यावेळी २०२४ पर्यंतच्या टर्मसाठी खासदार व्होट करून अध्यक्ष निवड करतील.


खासदारांनी कोणालाही व्होट केलं तरी ते संतापलेल्या जनतेला पटणार का हा खरा प्रश्न आहे. कारण संसदेपेक्षाही जनतेची ताकद मोठी अशा घोषणा इथे आंदोलक देत आहेत. त्यामुळे खासदारांची निवड जनतेला मान्य होणार का हाच खरा प्रश्न उरतो.