कदाचित तुम्हाला आता छोट्या तैमूरचा राग येणार नाही
अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा चिरंजीव छोटा तैमूरची बातमी आली, की अनेक नेटीझन्सना राग येतो.
जयवंत पाटील, मुंबई : अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा चिरंजीव छोटा तैमूरची बातमी आली, की अनेक नेटीझन्सना राग येतो. याविषयी अनेक फोन कॉल देखील आले आहेत. फेसबुक पेजवर तर अनेक तिखट प्रतिक्रिया येतात. तैमूरचा राग येण्याची कारणं, तशी लोकांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत नाहीत. एका प्रेक्षकाचा फोन आला, त्याने सांगितलं तैमूरपेक्षाही अनेक विषय महत्वाचे आहेत. यावर आपणास आणखी कोणते विषय महत्वाचे वाटतात, यावर त्यांनी सांगितलं, ज्यामुळे लोकांच्या समस्या सुटतील. तसेच शेती विषयालाही महत्व देण्यात यावं, असं एका प्रेक्षकाने फोन करून सांगितलं.
यावर शेतीविषयाच्या अनेक यशोगाधा आहेत, आपण त्या निश्चितच वाचा, आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. पण तैमूर सारखा विषय, सोशल मीडिया आणि वेबसाईटवर प्रेक्षकांकडून जास्त वाचला जातोय, हे वास्तव असल्याचं त्यांना सांगितलं. तैमूर सारख्या विषयाच्या बातम्या कमी वाचनात आल्या तर कोणतीही वेबसाईट या विषयाला महत्व देणार नाही. पण हा विषय जेव्हा लोकांकडून जास्तच जास्त वाचला जातो, तेव्हाच त्या विषयाच्या जास्तच जास्त अपडेट प्रत्येक वेबसाईटवर येतात.
मध्यंतरी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं होतं, तेव्हा अनेक दिवस श्रीदेवी यांच्या बातम्या झळकत होत्या, बहुतांश नेटीझन्स एकिकडे या बातम्या जास्तच जास्त वाचत होते, आणि दुसरीकडे प्रतिक्रियांमध्ये जड-जड, अर्वाच्य शब्दांनी आपला राग व्यक्त करत होते की. या बातम्या का देण्यात येत आहेत.
पण वास्तव हेच आहे की, जे प्रेक्षकांना पाहायला आवडतं तेच, टीव्हीवर किंवा वेबसाईटवर जास्त येतं. एखादी चांगली माहितीपूर्ण बातमी वाचणाऱ्या प्रेक्षकांची संख्या देखील मोठी आहे. ते फार हुशार जागृत प्रेक्षक म्हणावे लागतील, वेबसाईटसाठी देखील अशा 'स्मार्ट' वाचकांची नक्कीच मोठी गरज आहे. वाचकांनी ज्या विषयाला महत्व दिलं, त्या बातम्या नक्कीच जास्त येतील आणि ज्या विषयांना महत्व दिलं नाही, त्या देखील येणार नाहीत.
तैमूर हा प्रत्येक घरात असतो, तसा लहान मुलगा आहे, तैमूरवर राग काढण्यापेक्षा, शेती आणि माहितीपूर्ण विषय जास्त वाचले गेले तर, अशाच विषयांवर जास्त लिहिलं जाईल. जे अधिक जास्त वाचलं जातं, ते लिहिलं जातं, त्याच विषयावर जास्त पुस्तकं येतात, सिनेमा येतो, आणि इंटरनेटवरही तिच माहिती जास्त येते. कारण त्याकडे लोकांची आवड म्हणून पाहिलं जातं.
(वरील मत हे लेखकाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी झी मीडिया सहमत असेलच असं नाही)