`न्यायव्यवस्थेत बदल करा, बलात्कार प्रकरणात दया याचिका नकोच`
हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर चार आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं. या एन्काऊंटरनंतर देशभरात याचा आनंद व्यक्त केला जात आहे. आरोपींच्या मरणाने अनेक जण आनंद व्यक्त करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. याबाबत माजी क्रिकेटर आणि खासदार गौतम गंभीरने कायद्यांमध्ये बदलांची मागणी केली आहे.
'कायद्यामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये बदल केले गेले पाहिजेत. बलात्काराच्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयाला अंतिम ठरवलं गेलं पाहिजे. आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर दया याचिका दाखल करण्याचा अधिकारही देण्यात येऊ नये. कोणत्याही परिस्थितीत अशा गंभीर प्रकरणाचा निर्णय एका महिन्याच्या आत घेण्यात यावा. निर्णयानंतर फाशीची शिक्षाही एक महिन्यात देण्यात यावी' अशी प्रतिक्रिया गौतम गंभीरने दिली आहे.
हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला जाळून तिची हत्या करण्यात आली.
२७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर जाळण्यात आलं. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर आज त्यांना घटनास्थळी घेऊन जाण्यात आलं. आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तेलंगणा पोलिसांकडून चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं.