मुंबई इंडियन्सच्या `या` प्लेयरला पितृशोक, सचिनने वाहिली श्रद्धांजली
केरॉन पोलार्ड यांच्या वडिलांचे निधन
मुंबई : वेस्ट इंडीजचा मर्यादित षटकांचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्ड यांच्या वडिलांचे निधन झाले. कॅरिबियन अष्टपैलू पोलार्डने स्वत: सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघाने नुकत्याच वनडे आणि टी -२० मालिकेत श्रीलंकेला पराभूत केले. 9 एप्रिलपासून होणाऱ्या आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबई इंडियन्स संघातून खेळणार आहे.
पोलार्डने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो सोशल मिडियात शेअर केलाय. या फोटोत पोलार्ड आणि त्याचे वडील आयपीएल ट्रॉफीसह दिसत आहेत. 'मला माहित आहे तुम्ही जिथे असाल तिथे चांगल्या ठिकाणी असाल. आपण अनेक लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. मला तुमचा नेहमीच अभिमान वाटेल असे पोलार्डने कॅप्शनमध्ये म्हटले.
सचिनने श्रद्धांजली वाहिली
पोलार्डच्या वडिलांच्या निधनानंतर टीम इंडीयाचा दिग्गज खेळाडु सचिन तेंडुलकर यांने श्रद्धांजली वाहिली. सचिनने लिहिले की, "मला नुकतेच कळले आहे की तुझे वडील या जगात राहिले नाहीत." या दु: खाच्या घटनेत मी तुझ्या आणि तुझ्या सर्व कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. देव तुम्हाला या दुखातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य देवो' असे सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
पोलार्डचा जन्म 12 मे 1987 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झाला. वडील कुटुंबाला सोडून गेल्यामुळे पोलार्डचे संगोपन त्याच्या आईने केले. नंतर पोलार्डचे वडील पुन्हा पोलार्डसोबत दिसले. पोलार्डने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याची आई मजदुरी करुन पैसे गोळा करायची. कधीकधी कुटुंबाला फक्त एकच जेवण मिळवायचं.
पोलार्ड क्रिकेटपटू झाल्यानंतर कुटुंबाचे भाग्य बदलले. आज पोलार्ड जगातील 5 देशांमध्ये टी -20 लीग खेळत आहे. आयपीएल व्यतिरिक्त, पोलार्डने पीएसएल, दक्षिण आफ्रिकन टी -20 लीग, ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीगकडून कोट्यावधी रुपयांची कमाई करतोय.