अचूक करिअर निवडण्यासाठी स्वतःला हे `४` प्रश्न अवश्य विचारा!
माझ्यासाठी उत्तम आणि योग्य करिअर काय आहे? हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न.
मुंबई : माझ्यासाठी उत्तम आणि योग्य करिअर काय आहे? हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न. जीवनात योग्य करिअरची निवड करणं फार महत्त्वाचं असतं. काही विद्यार्थी करिअरची निवड करण्यापूर्वी करिअर काऊंन्सिलरचा सल्ला घेतात. पण तुमच्याशिवाय दुसरे कोणीही तुम्हाला जास्त ओळखू शकत नाही. त्यामुळे करिअर निवडण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा. हे प्रश्नांमुळे करिअर निवडण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर जाणून घेऊया काय आहे हे प्रश्न...
# मी कोणते काम न कंटाळता करु शकतो? हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याचबरोबर स्वतःला विचारा की, कोणते काम करणे, तुम्हाला अधिक भावते? जर तुम्ही तुमच्या आवडीने, मनाप्रमाणे कामाची, करिअरची निवड केली तर तुम्ही अधिक चांगले काम करु शकाल. त्यामुळे त्यानुसारच कोर्सची निवड करा. यामुळे यशाची पायरी गाठण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.
# मी ज्या कोर्ससाठी प्रवेश घेत आहे, त्याचा मला माझ्या करिअरमध्ये फायदा होईल का? हा प्रश्न स्वतःला विचारणे आणि त्यानुसार कोर्सला प्रवेश घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विनाकारण कोणत्याही कोर्समध्ये पैसे, वेळ वाया घालवणे काही कामाचे नाही.
# हा कोर्स माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे का? प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व वेगवेगळे असते. त्यानुसारच त्याला काम करायला आवडते. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच हा प्रश्न स्वतःला विचारणे, अगदी गरजेचे आहे.
# १० वर्षांनंतर मी स्वतःला कुठे बघतो? या प्रश्नावर तुमचे संपूर्ण करिअर अवलंबून असते. हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारल्याने तुम्ही स्वतःच्या ड्रिम करिअरसाठी पूर्ण मेहनत घेऊ शकाल. करिअरची ब्लू प्रिंट तुमच्याकडे तयार असेल आणि भविष्यातील तुमची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही.