नोकरी पाहिजे? मग, फेसबुकवर या चुका नको!
आजकाल नोकरी देताना उमेदवाराचा बायोडेटा किंवा त्याची मुलाखत इतकाच मुद्दा विचारात घेतला जात नाही. तर, त्याचे सोशल मीडिया प्रोफाईलही तपासले जाते
मुंबई : आजकाल जगाशी नाते जोडू पाहणारा व्यक्ती समाजमाध्यमांपासून (सोशल मीडिया) दूर असणे तसे काहीसे अशक्यच. पण, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याची नोकरी सोडून नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊ इच्छित असाल तर, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर सातत्याने फेसबुकवर कार्यरत असाल तर, वेळीच सावध व्हा. तुमची ही सवय तुम्हाला मिळणाऱ्या नोकरीत अडचणी निर्माण करू शकते. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, आजकाल नोकरी देताना उमेदवाराचा बायोडेटा किंवा त्याची मुलाखत इतकाच मुद्दा विचारात घेतला जात नाही. तर, त्याचे सोशल मीडिया प्रोफाईलही तपासले जाते. खास करून फेसबुक, ट्विटर आदी गोष्टी. उमेदवार सोशल मीडियावरील अकाऊंटवरून कशा पद्धतीने व्यक्त होतो. कोणत्या विषयावर पोस्ट टाकतो. त्याचे मित्र त्याला कोणत्या पोस्ट टॅग करतात. या सर्वांचा बारकाईने विचार केला जातो. त्यामुळे सोशल मीडियावरून काहीही पोस्ट करताना काही गोष्टींचा विचार तुम्हाला प्रामुख्याने करावा लागेल.
निगेटीव्ह कमेंट
सोशल मीडियावर विचार व्यक्त करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक, अभद्र किंवा भडकावू, कोणाच्या भावना दुखावणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे विचार व्यक्त करू नका. उमेदवारांच्या फेसबुक पोस्टवर व्यवस्थापनाची बारीक नजर असते. तसेच, तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर, आपल्या सहकाऱ्यासोबत सोशल मीडियावरून ओपन कम्यूनिकेशनपासून स्वत:ला दूर ठेवा.
टॅगिंगवर ठेवा नजर
अनेकदा तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईलवरून खूप चांगले चांगले फोटो, विचार पोस्ट करता. पण, तुमच्या वर्तुळातील मित्र हे वेगवेगळया विषयावरचे फोटो, विचार तुम्हाला टॅग करतात. अशा मंडळींपासून दूर रहा. कारण, तुमच्या मित्रांमुळे तुमची प्रतिमा नकारात्मक बनू शकते. अशा लोकांपासून स्वत:ला अनटॅग करा.
शेअरींग
तुम्हाला जर सण, उत्सव, समारंभ यांना उपस्थित रहायची आवड आहे. तर, जरूरी नाही की, प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो पोस्ट करण्याची गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन गेम खेळायची सवय असेल तर, मित्रांना ऑनलाईन निमंत्रण पाठवू नका. आपल्या प्रायवसी सेटींग्जवर लक्ष ठेवा.
संख्या नव्हे, गुणवत्ता
तुमची निवड करताना सोशल मीडियावर तुमच्या मित्रांची यादीही पाहिली जाते. यात तुमचे किती मित्र आहेत हे नव्हे तर, ते कोणत्या प्रकारचे आहेत हे पाहिले जाते. त्यामुले सोशल मीडियावर वावरताना काहीसे सांभाळून राहा.