कोरोना : पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्वाचा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. वार्षिक अहवाल पाहून त्यांना गुण दिले जातील. हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नववी, अकरावीचे उर्वरित पेपर हे १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार आहेत. महत्वाचं म्हणजे दहावीचे उर्वरीत पेपर हे वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांचे महत्वाचे निर्णय.
शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयावर शिक्षणंमत्री वर्षा गायकवाड ठाम आहेत. तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द केल्या आहेत. तसेच शालेय आणि इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध असणार आहे. कोरोनाचा प्रसार होत असल्यानं राज्यातील परिस्थिती संवेदनशील होच चालली आहे. राज्यात आतापर्यंत ४९ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, प्रवास टाळावा असे आवाहन वारंवार दिले आहे. एवढंच नाही तर शाळा आणि कॉलेजेस गेल्याच आठवड्यात बंद करण्यात आले होते. आता विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
थोड्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी नागरिकांना पुन्हा एकदा घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. एवढंच नव्हे तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद करण्यास सांगितली आहे. आज रात्री १२ पासून ही दुकानं बंद राहणार आहेत. फक्त आरोग्य सेवा आणि किराणा माल दुकानं फक्त खुली राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.