मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदी करण्यात आहे. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काहींच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. त्याचवेळी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानेही एक परिपत्रक काढून हे शुल्क भरण्यास एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील कोरोना साथीची सद्याची परिस्थिती, संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशाची उपलब्धता याबाबी विचारात घेता सर्व मंडळाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी घेताना सहानुभूती दाखविणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात शुल्क भरण्याची सक्ती करु नये, असे आदेशही राज्यसरकारकडून देण्यात आले आहेत.



दरम्यान, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने हे परिपत्रक काढले आहे. काही संस्थांनी असा तगादा लावल्याचं दृष्टीला आलं आहे, त्यामुळे शुल्क भरण्यासाठीच्या या मुदतवाढीबाबतची माहिती या सर्व महाविद्यालयं आणि संस्थांनी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर करावी. तसेच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळवावी, असं मनुष्य बळ विकास मंत्रालयानं कळवले आहे. अध्यापक आणि कर्मचाऱ्यांचं या काळातले वेतन दिले जाईल, असे केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चालू सत्रासाठी संचारबंदीच्या काळात ऑनलाईन वर्ग चालू राहतील, असेही मंत्रालयानं स्पष्ट केले आहे.