फ्रेंडशिप डे 2017: कशी झाली या दिवसाची सुरूवात? काय आहे वेगळेपण?
यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ जगभरातील अनेक मंडळी नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने साजरा करतील. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करणाऱ्या पण, या दिवसाचा इतिहास माहिती नसणाऱ्या आमच्या असंख्य वाचकांसाठी...
मुंबई : आजकालच्या तरूणाईला दोन दिवस फार महत्त्वाचे. तितकेच जवळचेही. पहिला ‘व्हॅलेंटाईन डे’. ज्यात लोक आपल्या मनातील प्रेमाची भावना दुसऱ्याला प्रपोज रूपाने सांगतात. तर, दुसरा ‘फ्रेंडशिप डे’. ज्याच्याशिवाय मानवी जीवन जगने कठीणच नव्हे तर, केवळ अशक्य. 6 ऑगस्ट हा यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’. जगभरातील अनेक मंडळी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतील. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करणाऱ्या पण, या दिवसाचा इतिहास माहिती नसणाऱ्या आमच्या असंख्य वाचकांसाठी...
तारखेनुसार नव्हे दिवसानुसार साजरा होतो ‘फ्रेंडशिप डे’
‘फ्रेंडशिप डे’ या दिवसची एक मोठी गंमत आहे. ती गंमत अशी की, हा दिवस तारखेनुसार नव्हे तर, दिवसानुसार साजरा केला जातो. थोडक्यात सांगायचे तर, ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जी कोणती ताऱीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा ‘फ्रेंडशिप डे’. यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ 6 ऑगस्टला साजरा होत आहे.
‘फ्रेंडशिप डे’ इतिहास
‘फ्रेंडशिप डे’चे वारे भारतात अगदी अलिकडचे असले तरी त्याची सुरूवात फार जूनी आहे. दक्षिण अमेरिकेतील देशात खासकरून पॅराग्वेत ‘फ्रेंडशिप डे’ मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दरम्यान, 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’चा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. ज्यानंतर सुरूवातीच्या काळात भेटवस्तू आणि भेटकार्ड देऊन शुभेच्छा देण्यावर भर देण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’
दरम्यान, भारतासोबतच दक्षिण अशियातील काही देशांनीही ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात. काही देश मात्र ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात पण, तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी नव्हे. तर, त्यांना सोईच्या असणाऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या दिवशी. ओहायोच्या ओर्बालिनमध्ये 8 एप्रिलला ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. तर, जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.
दरम्यान, 27 एप्रिल 2011ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत 30 जुलै हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता.
सोशल मीडियावरही हीट फ्रेंडशिप डे’
अलिकडील काही वर्षांत भारतातही ‘फ्रेंडशिप डे’ मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. बदलत्य काळाचे त्यातही डिजिटल इंडियाचे वारे भारतात वाहू लागल्यावर समाजमध्यमांना (सोशल मीडिया) भरते आले नाही तरच नवल. तर, अशा या सोशल मीडियाद्वारे, ज्यात व्हॉट्सएप, ट्विटर, फेसबुक आदींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. ज्यावर विवीध प्रकारचे डे साजरे केले जातात. फेसबुकसारखे समाजमाध्यमही मग म्युचिअल अंडरस्टॅंडीग करत तुमची दोस्ती दाखवायला लागते. मग ‘भूली हुई दास्तां...’ आठवायला लागते.