Scholarship Exam: 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा स्थगित
महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़
Maharashtra Scholarship Exam 2021 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (एमएससीई) ने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी च्या परीक्षा स्थगित केल्या आहे. महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2021 ही 23 मे रोजी होणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थितीनुसार परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल. यासंदर्भात अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.
वेबसाईटवर जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची प्राथमिकता लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षा- 2021 पुढे ढकलण्यात येत आहे. पुढील परीक्षेची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल. त्याचबरोबर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर पेजवरून याबाबतची माहिती दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता 23 मे रोजी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वर्ग 5) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वर्ग 8), 2021. पुढे ढकलण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातील सुमारे 47,662 शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये नोंदणी केली आहे. या परीक्षेत एकूण 6,32,478 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. त्यापैकी 3,88,335 विद्यार्थी 5 वी तर 2,44,143 विद्यार्थी हे 8 वीचे आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2021 ही 25 एप्रिल रोजी होणार होती. त्यानंतर ही परीक्षा 23 मे रोजी होणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र बोर्डाने साथीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलली असून दहावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे.