प्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा
कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी `झी २४ तास`शी बोलताना दिली.
दीपक भातुसे / मुंबई : कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. राज्यात काही कृषीविद्यापीठांत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड कोविड-१९' चा शिक्का मारण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थी, पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, विधिज्ञ असीम सरोदे यांनीही हा प्रश्न लावून धरला आहे. सरकारने योग्य पावले उचलली नाही अथवा या निर्णयाबाबत ठोस आश्वासन दिले नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.
कृषी विद्यापींठाचा अजब प्रकार, गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड कोविड-१९'
राज्यात राज्यात कृषी महाविद्यालयाचे २८००० विद्यार्थी आहेत. अमरावतीतील एका कृषी विद्यालयाने २४७ विद्यार्थींना कोविड १९ चा शिक्का असलेले प्रमाणपत्र दिले आहे. ही चूक ज्यांनी केलीय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. तसेच २४७ विद्यार्थ्यांना दिलेली कोविड- १९ ची प्रमाणपत्रे परत घेतली जातील आणि त्यांना कोविडचा शिक्का नसलेली नवीन प्रमाणात दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. काही विद्यार्थ्यांची परीक्षा झाली होती. मात्र, कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे वर्षाभरातील सरासरी गुणांची लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुण देत गुणपत्रिका देण्यात आल्या. मात्र, काहींच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का मारण्यात आला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांतर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.