मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं मागच्या अनेक वर्षांपासून धमाकेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी सादर केल्या जात आहेत. दिग्दर्शन, अभिनय, लेखन या सर्व विभागांमध्ये आलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेत अनेक कलाकार नवनवीन आणि तितक्याच बोलक्या कलाकृती सादर करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकृतींच्या याच गर्दीत काही दिवसांपूर्वी एक माहितीपट, अर्थात डॉक्युमेंट्री प्रसिद्ध करण्यात आली. एका ध्येयवेड्या आणि इतरांना अवाक् करणाऱ्या अशा एका व्यक्तीचा प्रवास यातून मांडला गेला. 


उराशी अनेक अपेक्षा, प्रचंड आत्मविश्वास आणि कधीही परिस्थितीपुढं न झुकणारी इच्छाशक्ती यांच्या बळावर एव्हरेस्टसह जगातील काही महत्त्वाची पर्वतशिखरं सर करणारा हा अवलिया.


निर्मल पुरजा... हे त्याचं नाव. तर, निम अशी त्याची ओळख. 


हे नाव फार क्वचितच किंवा गिर्यारोहणाच्या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्यांना ठाऊक होतं. पण, (Netflix) नेटफ्लिक्सवरच्या 14 Peaks: Nothing Is Impossible मुळं मात्र हे चित्र बदलत आहे. 


'माझी एक चुक मला, मृत्यूच्या दरीत लोटणारी ठरु शकली असती...', असं म्हणत जीवनात काहीच अशक्य नाही हाच मुलमंत्र जपणाऱ्या निर्मलची ही कहाणी. 


नेपाळच्या शेर्पांचं प्रतिनिधीत्त्वं करत गिर्यारोहण क्षेत्रात त्यांच्या योगदानाचं महत्त्वं किती आहे, याचीच जाणीव साऱ्या जगाला करुन देण्यासाठी निर्मलनं 'प्रोजेक्ट पॉसिबल' ही मोहिम हाती घेतली. 


अवघ्या 7 महिन्यांमध्ये त्यानं जगातील 8 हजारांहून अधिक उंचीच्या पर्वतशिखरांना सर केलं. 48 तासांत 3 शिखरं सर करण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. 


एव्हरेस्टवर गेलं असता तिथे गिर्यारोहकांची गर्दी झाल्याची धास्तावणारी बाब त्यानं पाहिली. तिथून निघतानाच त्यानं एक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. 


हा तोच फोटो होता, जो 'न्यूय़ॉर्क टाईम्स'सह इतरही अनेक ठिकाणी झळकला. निर्मलची ही मोहीम जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. 


पत्नी, कुटुंबीय आणि आपल्या टीमच्या साथीनं त्यानं अशक्य गोष्टी शक्य केल्या. 


निर्मलची कहाणी पाहताना अंगावर काटा उभा राहतो. अभिमान, भीती आणि अव्यक्त भावना मनात घर करतात. 


आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा गाठत शेर्पांच्या अस्तित्वाचं महत्त्वं साऱ्या जगाला पटवून देणाऱ्या याच निर्मलनं ही मोहिम तर पूर्ण केली. पण, आईपासून मात्र तो कायमचा दुरावला.... 



आजारपणामुळं निर्मलच्या मोहिमेनंतर त्याच्या आईनं अखेरचा श्वास घेतला. मुलाची अद्वितीय कामगिरी या मातेनं स्वत: पाहिली आणि गर्वानं तिचीही मान उंचावली. 


एखाद्या परप्रांतीय गिर्यारोहकानं केलेल्या कामगिरीची जगभरात जितकी वाहवा होते, किमान त्याहून अर्धी नेपाळी शेर्पांची झाली तरीही ही बाब दिलासादायक असेल याचसाठी निर्मल आग्रही होता. 


याच ध्येयापोटी त्यानं 14 शिखरांवर आपली छाप सोडत एक नवा विक्रम रचला.