मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती लोकप्रियता पाहता एकंदरच प्रेक्षकांचा कल पाहून निर्माते- दिग्दर्शकही त्याच धाटणीचे चित्रपट साकारत आहेत. या साऱ्याला जोड मिळत आहे ती म्हणजे कलाकारांच्या लोकप्रियतेची. असाच एक चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असणारा '२.०' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये तेजी पाहायला मिळाली. 


आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात जवळपास ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या कमाईचे एकूण आकडे पाहता हा आलेख येत्या काळात आणखी उंचावण्याची चिन्हं आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट करत '२.०'च्या कमाईविषयी काही माहिती दिली. 


गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट पुढे जात आहे. त्यामुळे एकंदरच आता येत्या काळात कमाईचे आकडे राजामौलींच्या 'बाहुबली' या चित्रपटाचेही विक्रम मोडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


जवळपास ७ हजार चित्रपटगृहांमध्ये सुपरस्टार रजनी आणि खिलाडी कुमारच्या अभिनयाची जुगलबंदी असणारा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ज्याला अमेरिकेत चांगला प्रतिसाद मिळाला. अमेरिकन बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणारा '२.०' हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट ठरला आहे. 




एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचा निर्मिती खर्च आतापर्यंत चर्चेचा विषय ठरला होता. आतापर्यंत भारतात कोणत्याच चित्रपटाच्या निर्मितीसाठी इतका निर्मिती खर्च करण्याच आला नव्हता. उच्च प्रतीचं तंत्रज्ञान, तगडी स्टारकास्ट या साऱ्याची सांगड घालत साकारण्यात आलेला हा चित्रपट मैलाचा दगड रचणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.