परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...२० वर्षांपासून हिरा ठाकूरची लोकप्रियता कायम
`सूर्यवंशम`ला २० वर्ष पूर्ण
मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' चित्रपट सर्वात प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. टिव्हीवर अनेक वर्षांपासून 'सूर्यवंशम' सतत दाखवला जातो. २१ मे १९९९ साली 'सूर्यवंशम' प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. यात मुलगा आणि वडिल या दोनही भूमिका त्यांनी स्वत: केल्या होत्या. ७ कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास १२ कोटी ६५ लाख रुपये कमाई केली होती.
टिव्ही चॅनेलवर सतत दाखवल्या जाणाऱ्या 'सूर्यवंशम'बाबत अनेक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो की 'सूर्यवंशम' सारखा सारखा टिव्हीवर का दाखवला जातो? याचं उत्तर अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे. चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमिताभ यांच्या एका चाहत्याने एक ट्विट केलं आहे. ज्यात टिव्ही प्रोग्रामचा टीआरपी दाखवणारी लिस्ट शेअर केली आहे. २०१८ मध्ये 'गोलमाल अगेन'नंतर 'सूर्यवंशम' सर्वाधिक लोकांनी पाहिला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ते ट्विट रिट्विट केलं आहे. या रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये 'सूर्यवंशम जबरदस्ती सतत दाखवला जातो हा गैरसमज आहे. परंतु सत्य हे आहे की, सूर्यवंशमच्या हाय रेटिंगमुळे तो सतत प्रसारित केला जातो.'
'सूर्यवंशम' २१ मे १९९९ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु तरीही 'सूर्यवंशम' टिव्हीवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटावर तयार होणाऱ्या अनेक मीम्समुळे चित्रपट सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असतो. कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भर देणारा, विविध भावभावनांची सरमिसळ असलेला हा चित्रपट तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला आणि एकमेव हिंदी सिनेमा आहे.