217 Padmnini Dhan Marathi Natak Prayog: मराठी नाट्यसृष्टीही मराठी मालिका, चित्रपटांप्रमाणेच बहरते आहे. मराठी नाटकांनाही प्रेक्षक तूफान गर्दी करताना दिसत आहते. सध्या '217 पद्मिनी धाम' हे नाटकही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवता दिसत आहे.  या नाटकाचे येत्या 24 ते 28 नोव्हेंबरला सलग पाच प्रयोग होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी साहित्यविश्वातील अजरामर नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता, चित्रकार अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी त्यांची छाप प्रेक्षकांवर सोडली. मतकरी म्हटले की, डोळ्यासमोर येते ते त्यांचे विपुल साहित्य. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा विविध प्रकारातून मोठ्या स्वरूपात लिखाण केले. त्यांच्या लिखाणावर आधारित अनेक नाटकं, सिनेमे आपण पाहिले आहेत.


मतकरी यांच्या लिखाणाच्या समुद्रातील एक अतिशय उत्कृष्ट कथा म्हणजे ‘कामगिरी’. वास्तव आणि अवास्तव यांच्यातील संघर्ष आणि त्यातून एका व्यक्तीची होणारी घालमेल याचा जिवंत देखावा कामगिरी या कथेत मांडण्यात आला आहे. याच कथेवर आधारित '217 पद्मिनी धाम' हे व्यावसायिक नाटक आता रंगभूमीवर दाखल होत आहे. गूढ आणि रहस्य याच सोबत भयाची एक गोष्ट हे नाटक मांडत आहे. मागच्यावर्षी ‘217 पद्मिनी धाम’ ही एकांकिका तुफान गाजली होती. आता यावर आधारित नाटक लवकरच रंगमंचावर येत असून या नाटकाचे सलग 5 प्रयोग 24 ते 28 नोव्हेंबरमध्ये संपूर्ण मुंबईत होणार आहेत. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभ होणार असून त्यानंतर आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण, कालिदास नाट्यगृह मुलुंड, विष्णुदास भावे वाशी आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली असे अनुक्रमे पाच प्रयोग होणार आहेत.  


रत्नाकर मतकरींच्या अजरामर गुढ कथा : 


उत्तम साहित्याची रचना करणाऱ्या या लेखकाची अनेक पुस्तकं गाजली. यामध्ये त्यांच्या गूढकथांचा एक स्वतंत्र चाहतावर्ग होता. मतकरी यांनी जवळपास दिडशेपेक्षा जास्त गूढकथांचं लेखन केलं आहे. त्यासोबतच त्यांच्या काही कादंबऱ्या, कथासंग्रहदेखील गाजले. रत्नाकर मतकरी यांनी जवळपास 32 नाटकं, 23 कथासंग्रह, 6 निबंध संग्रह, 16 एकांकिका, 12 बालकुमार नाटकं आणि 3 कादंबर्‍या असे विविध कलाकृतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लिखाण केलं आहे. त्यांच्या अनेक कलाकृती आज पर्यंत रंगभूमी आणि इतर माध्यमांत जिवंत आहेत. आता यात ‘कामगिरी’ची देखील भर पडणार आहे.


या नाटकाचे दिग्दर्शक संकेत पाटील याने केले असून, नचिकेत दांडेकर याने रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी‘ या कथेचं या नाटकात रूपांतर केले आहे.  करण भोगलेने नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली. या नाटकाच्या निमित्ताने मिलिंद शिंदे हे पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार आहे. या नाटकात ‘पद्मिनी’ची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारत असून, मध्यवर्ती भूमिका अभिनेता ऋतुराज फडके साकारत आहे.