कपिल देव होऊन रणवीरने मारला `नटराज शॉट`
त्याचं हे रुप पाहून आठवले ना गतकाळातील दिवस?
मुंबई : क्रिकेट या खेळाला भारतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. काहींसाठी तर, हा खेळ म्हणजे एक प्रकारचं तप आहे. अशाच काहींमधील एक नाव म्हणजे ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव. भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवत संघाला पहिलावहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या या अफलातून खेळाडूच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा चित्रपट बॉलिवूडमध्ये साकारण्यात येत आहे.
अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातील त्याचा लूक काही दिवसांपूर्वीच सर्वांसमोर आला होता. या लूकमध्ये रणवीरने कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी स्वत:मध्ये केलेले बदल अगदी स्पष्टपणे दिसत होते.
त्यामागोमागच आता रणवीरच्या '८३' या चित्रपटातील आणखी एक नवं रुप सर्वांसमोर आलं आहे. हे रुप पाहता क्रिकेटच्या मैदानात धावपट्टीवर विरोधी संघातील खेळाडूंना कपिल देव कसा घाम फोडत होते, यावरुन पडदा उचलला गेला आहे.
रणवीरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो कपिल देव यांच्या रुपात 'नटराज शॉट' मारताना दिसत आहे. 'नटराज शॉट', इतकंच लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूला जोरदार फटका दिल्यानंतर तो चेंडू कुठवर जातो हेच हेरण्यासाठी त्यावर कपिलरुपी रणवीरची नजर रोखलेली दिसत आहे. चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वास, आवेग आणि चेंडू भिरकावून लावण्याचा अनोखा अंदाज पाहता हा 'नटराज शॉट' नेमका आहे तरी कसा याचा अंदाज येत आहे.
कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये क्रिकेटच्या इतिहासातील काही पानं पुन्हा उलटण्यात येणार आहेत. ज्या माध्यमातून पुन्हा एकदा १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने कबीर खान एक तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. त्यामुळे आता त्याचा हा मल्टीस्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवरही विजयी षटकार मारतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.