मुंबई : विनोदवीर रजू श्रीवास्तव (Raju Srivastav) गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूला झुंज देत आहे. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी  कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. राजू अद्यापही शुद्धीवर आलेले नाहीत, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सतत डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. ऑक्सिजनच्या मदतीने नवीन पेशी तयार करून त्यांचा मेंदू थोडासा बरा होईल, अशी अपेक्षा एम्सच्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार राजू गेल्या 10 दिवसांपासून व्हेंटीलेटरवर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे राजू यांना शुद्धीवर येण्यासाठी आणखी 2 आठवडे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असल्याचं कळत आहे. राजू यांची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी श्रीवास्तव कुटुंबाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. 


राजू यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृतीसाठी खास पूजा ठेवली आहे, जी दिल्लीतच त्यांचा मोठा भाऊ सीपी श्रीवास्तव यांच्या घरी सुरू आहे. पत्नी शिखापासून ते संपूर्ण कुटुंब या पूजेत सामील आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या घरी पूजा सुरु असून पुढील चार दिवस पूजा सुरु राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम राजू श्रीवास्तव यांच्यावर 24 तास देखरेख करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजूचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी वाढली होती. त्यामुळे डॉक्टरांनी कोणालाही भेटण्यास नकार दिला आहे.


दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  


कुटुंबियांची सहमती, डॉक्टरांचा निर्णय
कुटुंबियांच्या सहमतीनंतर श्रीवास्तव यांना भेटायला कोणीच जाणार नाही, असा निर्णय डॉक्टरांनी खबरदारी म्हणून घेतला आहे. याशिवाय काही नातेवाईकांचे ऑडियो मेसेज श्रीवास्तव यांना ऐकावले जात आहेत. त्यामुळे श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचीतसा फरक आहे.