गायिका नंदिनी श्रीकर यांची सुरेल हॅट्रिक
दक्षिण भारतीय कुटुंबात जन्मलेल्या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नंदिनी श्रीकर यांना लहानपणापासून संगीताची आवड होती.
मुंबई : आपल्या मधुर स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलीवूडगायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुरेल हॅट्रिक साधली आहे. ‘उनाड’ चित्रपटातील ‘क्षण काळचे’ या गाण्यासाठी यंदाचा फिल्मफेअर, झी चित्रपट गौरव, मटा सन्मान असे तीन अतिशय मानाचे पुरस्कार पटकावत त्यांनी आपली छाप पाडली आहे. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंदिनी सांगतात कि, आपल्या कामाला प्रेक्षकांची पोचपावती मिळणं आवश्यक आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला ती मिळाली आहे. मला ‘उनाड’ च्या टीमने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.
दक्षिण भारतीय कुटुंबात जन्मलेल्या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नंदिनी श्रीकर यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. आयटी क्षेत्रातला जॉब करत असताना १९९७ साली संगीतकार हरिहरन यांची त्यांनी भेट घेतली. नंदिनी यांचा सुरेख आवाज ऐकून त्यांची शिफारस त्यांनी विद्यासागर यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांचा बॉलीवूडचा प्रवास सुरु झाला. त्रिलोक गुर्टू , रणजीत बारोट अशा दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. आयटीतल्या जॉबमुळे तंत्रज्ञानाचा सुरेख उपयोग करत संगीतातही नंदिनी यांनी वेगवेगळे प्रयोग केले कॉफी आणि एअरलाइन्सच्या जाहिरातींसाठी त्यांनी अनेक जिंगल्स केल्या. त्यानंतर अनेक उत्तम काम मिळत गेली.
कर्नाटक, हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीत या सगळ्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ च्या निमित्ताने मराठीतही आपल्या आवाजाच्या गोडव्याने आपला वेगळेपणा सिद्ध करून दाखविला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण), छायांकन, गीतकार, पार्श्वसंगीत या विभागासाठी ही पाच फिल्मफेअर पुरस्कार घोषित झाले आहेत.
अर्थ क्रिएशन, ऑरोरा प्रोडक्शन आणि नम्रता आर्ट्सच्या बॅनरखाली चंद्रेश भानुशाली, अजित अरोरा व प्रीतेश ठाकूर यांनी 'उनाड' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांचं आहे. आशितोष गायकवाड, हेमंल इंगळे, देविका दफ्तरदार, देवेंद्र पेम या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.