मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री  लेखिका मुग्धा गोडबोले-रानडेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्रीसोबत फसवणुकीचा प्रकार घडल्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. हा संपूर्ण प्रकार अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे. तसंच तिला आलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉट देखील मुग्धा गोडबोलेने शेअर करुन  लोकांना सतर्क केलं आहे. अभिनेत्रीसोबत हा संपुर्ण प्रकार ८ फेब्रुवारीसोबत घडला. या संदर्भातील पोस्ट शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना सतर्क केलं आहे. याचबरोबर काळजी घेण्याचं आवाहनही अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''5 फेब्रुवारी ला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉड चा प्रयत्न. मी दुसऱ्या दिवशीच्या लताबाईंवरच्या कार्यक्रमाच्या तालमीत होते. खूप गडबड, मागे वाद्यांचे आवाज. अश्यात मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की मी तुमच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले आहेत ते पैसे मी तुमच्या अकाऊंट वर परत जमा करावेत. 12,500 रुपये आहेत. बोलताना तो नवऱ्याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटलं. पुढे त्याने आधी 10,000 रुपये transfer केल्याचा मेसेज आला आणि मग 25000 रुपये पाठवल्याचा मेसेज आला.'' 


पुढे अभिनेत्री म्हणतेय, ''त्याच वेळी माझ्या gpay अकाऊंट वरही मेसेजेस आले. हे सगळं वाऱ्याच्या वेगाने सुरू होतं. आणि मग तो म्हणू लागला की मी चुकून 2,500 चया ऐवजी 25,000 ट्रान्स्फर केले आहेत तर कृपया ते परत करा.  मधल्या काळात मी नवऱ्याशी सम्पर्क केला. त्यानं सांगितलं असं काहीही नाहीये. एकीकडे ह्या माणसाचे सतत फोन येत होते. आता त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. शेवटी मी त्याला ओरडले. पैसे मिळणार नाहीत म्हणून. त्याने माझ्या नवऱ्याच्या नंबरवर फोन केला.''


पुढे अभिनेत्री म्हणतेय, ''त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाच्या ऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा. माझ्या नवऱ्याने त्याला आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंट चा स्क्रीन शॉट मागवला. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्या कडचे मेसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता तो हा खाली दिलेला. त्या क्षणी हे मेसेज बँकेकडून आलेले नाहीत हे आपल्याला कळत नाही. त्याचा ड्राफ्ट तंतोतंत आहे.'' 



पुढे अभिनेत्री म्हणतेय, ''माझ्या सुदैवाने मी ह्याला बळी पडले नाही. पण ह्याकडे लक्ष द्या. रोज नवीन पद्धती वापरून कुणीतरी आपल्याकडून आपले कष्टाचे पैसे चोरतो आहे. ह्यांच्याकडे माझा आणि माझ्या नवऱ्याचा नंबर होता. आम्ही समोरा समोर नसू ह्याचाही कदाचित अंदाज होता. डोळे कान आणि मेंदू 24 तास चालू ठेवणं ह्याला आता पर्याय उरलेला नाही.'' अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.