संजूबाबाच्या आईची एक इच्छा पूर्ण होणारचं होती, पण ५ दिवसांपूर्वीचं झालं निधन
संजय दत्तला त्याच्या करियरमध्ये लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली पण संजयला त्याच्या आयुष्यात अनेक प्रसंगांचा सामना देखील करावा लागला.
मुंबई : संजूबाबा म्हणजे बॉलिवूड अभिनेता संजय दत्त. संजय दत्तला त्याच्या करियरमध्ये लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली पण संजयला त्याच्या आयुष्यात अनेक प्रसंगांचा सामना देखील करावा लागला. तसं पाहायला गेलं तर आज संजूबाबासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. बॉलिवूडमध्ये संजयला आज 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. संजयने 'रॉकी' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पाय ठेवला. पण संजयचं हे यश त्यांची आई आणि दिग्गज अभिनेत्री नरगिस यांना पाहाता आलं नाही.
आज संजयचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये संजयचे वडील सुनील दत्त एका खूर्चीत बसले आहेत मधली खूर्ची रिकामी आहे आणि रिकाम्या खूर्चीच्या बाजूला संजय बसला आहे. फोटो संजयच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आहे. चित्रपटचं प्रिमियम 8 मे रोजी होतं. पण 3 मे रोजीचं नरगिस यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपल्या मुलांचं यश आपल्या डोळ्यांनी पाहावं. त्याल्या यशस्वी झाल्याचं पाहून जोरजोरात टाळ्या वाजवायच्या. पण नरगिस यांचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त काही दिवस बाकी होते. पण त्याआधीचं त्यांचं निधन झालं. नरगिस यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. पण त्या कर्करोगा विरूद्ध लढाई जिंकू शकल्या नाहीत.
कर्करोगामुळे त्यांच्या शरिराला खूप त्रास होत होता. त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. असं म्हटलं जातं की, डॉक्टरांनी सुनील दत्त यांना सल्ला दिला की, नरगिस यांचं लाइफ सपोर्ट सिस्टम काढून टाका. मात्र सुनील दत्त यांनी हे करण्यास नकार दिला. ते शेवटपर्यंत नरगिस यांच्यासोबत राहिले. अखेर 3 मे 1981 मध्ये 58 साली नरगिस यांचं कॅन्सरमुळे निधन झाले.