मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अँकर कोण? मिलिंद गवळींनी सांगितली 9 कलाकारांची नावे
या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल खुलासा केला. मिलिंद गवळींनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेने लोकप्रिय मालिका म्हणून सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून अनेक ट्वीस्ट पाहायला मिळाले. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत कायमच टॉप 10 मध्ये पाहायला मिळाली. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, यश, ईशा, कांचन, अप्पा, अभिषेक हे पात्र सातत्याने चर्चेत असतात. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल खुलासा केला.
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यासोबतच ते त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांबद्दलही सांगताना दिसतात. आता मिलिंद गवळींनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबतच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात ते 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024' यातील 'सर्वोत्कृष्ट निवेदक' हा पुरस्कार वैदही परशुरामी आणि सारा पालेकर यांना देताना दिसत आहेत.
मिलिंद गवळी यांची पोस्ट
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024. या कार्यक्रमामध्ये वर्षा उसगावकर आणि माझ्या हस्ते तीन पुरस्कार देण्यात आले त्यात बेस्ट स्टायलिश पुरुष २०२४ हा पुरस्कार अभिजीत खांडकेकर यांना देण्यात आला, आणि सर्वोत्कृष्ट निवेदक हा पुरस्कार वैदही परशुरामी आणि सारा पालेकर यांना देण्यात आला. हे संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिजीत यांनी केलं होतं. त्याला निवेदनाचा पुरस्कार पण मिळायला हवा होता. अतिशय सुंदर पद्धतीने निवेदन केलं त्याने, खरंच निवेदन करणं ही एक कला आहे, चांगला निवेदक असेल तर त्या कार्यक्रमांमध्ये रंगत येते, कार्यक्रम कधी सुरू झाला कधी संपला हे आपल्याला कळतच नाही, परत वेळेला निवेदकाला हजर जवाबी राहणं गरजेचं आहे, एैन वेळेला कार्यक्रमात गडबड झाली गोंधळ झाला एक चांगला निवेदक ते सगळं सावरून घेतो.
प्रेक्षकांची खूप चांगला संवाद साधतो, भाषेवर त्याचं प्रभुत्व असतं, चांगला निवेदका मध्ये presence of mind असणं गरजेचं आहे, त्याच्यात sense of humour, त्याचा स्वभाव मिश्किल असेल, तर कार्यक्रमांमध्ये धमालच येते. मराठीमध्ये मला भावलेले निवेदक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव, सुमित राघवन, स्मिता गव्हाणकर, समीरा गुजर, विघ्नेश जोशी, पुष्कर छ्योत्री, अमय वाघ, वैदही परशुरामी, असे अनेक निवेदक आहेत जे मला भावले. काहींची नावे मला आता आठवत नाहीत.
निवेदन ही एक वेगळीच कला आहे, प्रत्येकाला चांगलं निवेदन करता येईलच असं नाहीय, चांगल्या कलाकारांला चांगले निवेदन करता येईल असं नाही किंवा एका चांगल्या निवेदकाला चांगला कलाकार होता येईल असेही नाहीय, या दोन्ही गोष्टी एखाद्याला जर साधता आल्या तर मग ते सोन्याहून पिवळ... स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 खरंच छान सादर झाला, मजा आली, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.
मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने कमेंट केली आहे. त्याने "Sir.. alwyss lv u..मी चांगला निवेदक आहे की नाही मला खरच नाही.. पण तुम्ही खुप प्रेमाने दिग्गजांबरोबर माझं नाव घेतलत... सर कामातला प्रामाणिकपणा जपण्याचा नेहमी प्रयत्न करतो.. आणि तुम्ही केलेलं कौतुक खुप प्रेरणा देतं सर.. lv uu alwyss", असे सिद्धार्थने कमेंट करताना म्हटले आहे. तर सिद्धार्थ चांदेकरने "सर तुमच्याकडून कौतुक होणं ही मोठी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद", अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अभिनेता अभिजीत खांडकेकरने "मिलिंद सर तुम्ही नेहमीच भरभरून कौतुक करता. मनापासून आभार ह्या प्रेमासाठी….तुम्ही एव्हरग्रीन आहात", असे म्हटले आहे.